नाशिक, ३ जून २०२३ : नाशिक शहरात मागील काही दिवसामध्ये सातत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारवाईचा सपाटा सुरु आहे. सातत्याने नाशिक शहरातील बड्या अधिकाऱ्यांच्या लाच प्रकरणात मुसक्या आवळण्यात येत आहे. आता केलेल्या मोठ्या कारवाईत मनपा शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना एसीबीच्या पथकाकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे आहे.
नाशिक मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. डॉ. सतीश खरे यांच्यावरील कारवाईनंतर ही सर्वात मोठी कारवाई नाशिकच्या मनपा शिक्षण विभागात करण्यात आली आहे. येथील मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत कर्मचारी नितीन जोशी यांना देखील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे. यानंतर धनगर यांच्या घराची झाडाझडतीचे आदेश अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिले असता त्यांच्याकडे एकूण ८५ लाखांची रोकड आणि ३२ तोळे सोने हाती लागल्याने कारवाई करणारे पथकही चक्रावून गेले.
त्याचबरोबर धनगरांच्या नावावर दोन आलिशान फ्लॅट आणि एक जागा देखील आहे. म्हत्वाचे म्हणजे उंटवाडी परिसरातील राहत्या फ्लॅटचीच किंमत दीड कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सुनीता धनगर यांची बँक खाती, लॉकर्स याबाबत तपास सुरु असून सुनीता धनगरांनी आणखी किती माया गोळा केली आहे ते समोर येणार आहे.
नाशिक मधील एका खाजगी शिक्षण संस्थेच्या, हिंदी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना काही कारणास्तव संस्थेने निलंबित केले. त्या विरोधात त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरणात दाद मागितली. न्यायाधिकरणाने मुख्याध्यापकांच्या बाजूने निकाल दिला. मात्र तरीही संस्थेने त्यांना नियुक्ती देण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे मुख्याध्यापकांनी अर्ज केला. संस्थेला नियुक्ती करण्याचे आदेश देण्यासाठी धनगर व लिपिकाने लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर