‘एसटी’ची नवीन पहिली लालपरी बस पुणे विभागात दाखल

पुणे, २८ डिसेंबर २०२२ : ‘गड्या आपुली लालपरीच बरी’ म्हणत बहुतांश प्रवासी एसटी महामंडळाच्या साध्या लाल बसनेच प्रवास करण्यावर भर देत असतात; मात्र ‘एसटी’च्या ताफ्यातील या बहुतांश लालपरी बसचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. आणि या बस सातत्याने बंद पडत होत्या. त्यामुळे एसटी प्रशासनाने नव्या लालपरी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नव्या लालपरी एसटी बस राज्यभरातील ‘एसटी’च्या विभागीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या डेपोंमध्ये समाविष्ट होत असून, ‘एसटी’ची नवीन पहिली लालपरी बस सोमवारी (ता. २६) पुणे विभागात दाखल झाली. ही बस पुणे ते वाशीमदरम्यान प्रवासी सेवा पुरविणार आहे. या बसचे तिकीट दर साध्या बसच्या दराप्रमाणेच राहणार आहे.

दरम्यान, ‘एसटी’च्या पुणे विभागासाठी तब्बल ८० नव्याकोर्‍या लालपरी बस दाखल होणार आहेत. यातीलच पहिली बस सोमवारी पुणे विभागात दाखल झाली. ही बस पुणे विभागातील मुख्यालयात आणण्यात आली असून, तिचे पहिले चालक सुमित शेंडे, तर वाहक प्रशांत मोहबे हे आहेत.

नवीन लालपरी बसमध्ये आहेत या सुविधा…
१) बसमधील सीट पुशबॅक व बकेट पद्धतीची
२) प्रवाशांसाठी खिडकीच्या उंचीत वाढ
३) बसचा दरवाजा ऑटोमेटिक
४) बसमध्ये इमर्जन्सी (पॅनिक) बटन
५) प्रवाशांच्या मोबाईल चार्जिंगची सोय
६) बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनाउन्समेंट सिस्टीम
७) बसमध्ये ४७ प्रवासी प्रवास करू शकतात
८) बसच्या मागील बाजून ‘इमर्जन्सी एक्झिट’

दोनशे जुन्या एसटी बस भंगारात
एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या ताफ्यातील जवळपास दोनशे लालपरी बसचे आयुर्मान संपल्यामुळे भंगारात काढल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाला नव्या बसची गरज आहे. त्यामुळे नव्याकोऱ्या ८० लालपरी बस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया मंजूर झाली आहे. या बस भाडेतत्त्वावरील असणार आहेत. यासोबतच यापूर्वी एसटीच्या पुणे विभागात नव्या दोन ई-बस दाखल झाल्या आहेत. आणि आणखी नव्या ईलेक्ट्रिक बसदेखील येणार आहेत. त्यामुळे लालपरी बससह एसटीचा पुणे विभाग आता कात टाकणार असल्याचे चित्र दिसत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा