नाशिक, 19 एप्रिल 2022: राज्यात अजान आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी लाऊडस्पीकरबाबत नवा आदेश दिलाय. नव्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक लावण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे. यासह त्यांनी मशिदीच्या 100 मीटर परिसरात मनसे कार्यकर्त्यांना लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी घातली आहे. गृह विभाग लवकरच संपूर्ण राज्यासाठी तसा आदेश काढणार आहे.
सोमवारी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं की, येत्या एक ते दोन दिवसांत गृह विभाग धार्मिक स्थळांवर लाऊड स्पीकर लावण्याबाबत परिपत्रक काढणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिलाय. दीपक पांडे यांनी धार्मिक स्थळांना 3 मेपर्यंत लाऊडस्पीकरबाबत परवानगी घेण्यास सांगितलंय. परवानगी दिल्यानंतर ते केवळ वैध डेसिबलमध्ये स्पीकर वाजवू शकतील.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा केली जाईल
दीपक पांडे पुढं म्हणाले की, नियमानुसार सर्व मशिदी, मंदिरं, गुरुद्वारा, चर्च आणि इतर धार्मिक स्थळांना स्पीकर लावण्यासाठी लेखी अर्ज करावा लागंल. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. यामध्ये 4 महिने ते एक वर्ष तुरुंगवासाचीही तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही सर्वांना परवानगी देऊ, असं नाशिक आयुक्तांनी सांगितलं.
मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसाला बंदी
आयुक्त दीपक पांडे पुढं म्हणाले की, आम्ही या प्रश्नावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि कोणत्याही किंमतीत धर्माच्या आधारे तेढ निर्माण होऊ देणार नाही. आयुक्त दीपक पांडे यांनी आपल्या नव्या आदेशात मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा वाजवण्यास परवानगी दिली जाणार नाही, असं म्हटलं आहे. तेथे कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर त्याची परवानगी आधी पोलिसांकडून घ्यावी लागेल. हनुमान चालिसाच्या कार्यक्रमावेळी पोलीस पथकही तेथे उपस्थित राहणार आहे.
मनसे कार्यकर्त्यांना स्पीकर वाजवता येणार नाही
पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मशिदीच्या 100 मीटर परिसरात स्पीकर लावून हनुमान चालीसा वाचण्याचा अधिकार नाही. समाजात कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ देणार नाही. सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणं हाच त्यांचा उद्देश आहे. नाशिक पोलिसांच्या नव्या आदेशानुसार मशिदीच्या 100 मीटर परिसरात प्रार्थनेपूर्वी 15 मिनिटं आणि नमाज संपल्यानंतर 15 मिनिटं हनुमान चालीसा, भजन, गाणं वा स्पीकर वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
झेंडा लावण्याच्या वादानंतर अमरावतीत कलम 144
गेटवर ध्वज बसवण्यावरून आणि काढण्यावरून वाद सुरू झाल्यानंतर काल अचलपूर आणि परतवाडा भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या या वादानंतर सोमवारी सकाळी याप्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आलीय. याच प्रकरणी 35 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशिरापासून अचलपूरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनाच एकत्र येण्याची परवानगी दिली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, सध्या परिस्थिती सामान्य आहे.
रविवारी रात्री दहाच्या सुमारास ध्वज हटवण्यावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी आणि दगडफेक झाली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण मिटलं. हा वाद चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी घेत कलम 144 लागू केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे