नागपूर ५ मे २०२३: दरवर्षी प्रमाणे यंदाही मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी आला आहे. जंगल सफारीच, वन्यजीव आणि फोटोग्राफीच तेंडुलकरला वेड आहे. वेळ मिळेल तेव्हा तो देशातील विविध व्याघ्र प्रकल्पानां भेट देत असतो. काही दिवसांपूर्वीच सचिनने अमरावती जवळील उमरेड करंडला अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद लुटला होता.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी, सचिन कुटुंबातील सदस्य आणि काही जवळच्या मित्रांसोबत गुरुवारी नागपुरात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होत्या. सचिनच्या नागपूर विमानतळावर आगमनाची बातमी समजताच चाहत्यांची एकच गर्दी उसळली होती. विमानतळावर सुरक्षा दलाच्या जवानांनीही सचिनचे जोरदार स्वागत केले.
सचिनने फेब्रुवारी महिन्यातही ताडोबात सफारी केली होती. सचिन तीन दिवस ताडोबा मुक्कामी होता. त्यावेळी त्याला तारा, माया, बिजली हे वाघ तसेच अस्वल व काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. उमरेड-करांडलामध्ये सुध्दा त्याला वाघांचे दर्शन झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर सचिन आणि त्याचे कुटुंबीय नागपूरहून रस्त्याने ताडोबासाठी रवाना झाले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त गुरुवारी वन्य प्राण्यांची गणना होणार आहे. हवामान स्वच्छ राहिले तर सचिनला बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्य प्राणी दिसतील अशी अपेक्षा आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.