पुणे, १९ जानेवारी २०२३ : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने ‘संस्कार भारती’, पिंपरी-चिंचवड समितीच्या चित्रशिल्पहस्त कला विभागप्रमुख श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्या कल्पनेतून स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतींना आपल्या कलेद्वारे अभिवादन करण्याचे योजिले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील कमीत कमी ७५ कलासाधक आपली कला रसिकांसमोर प्रदर्शित करतील अशी अपेक्षा होती. तथापि, कलासाधकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानामुळे ‘स्मृतिरंग ७५’ हे प्रदर्शन १०० पेक्षा जास्त कलासाधकांच्या सहभागाने संपन्न होणार आहे.
‘स्मृतिरंग ७५, (पुष्प १७)’ या पिंपरी-चिंचवड परिसरातील सात कलाकारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजता सौ. वसुधा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते व श्री. शेखरजी चिंचवडे, श्री. मिलिंद तेलंग व श्री. प्रवीण चौधरी यांच्या उपस्थितीत झाले. दीपप्रज्वलन व ‘संस्कार भारती’च्या ध्येयगीताने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सौ. वसुधा कुलकर्णी यांचे स्वागत समितीच्या सचिव सौ. लीना आढाव यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते श्री. शेखरजी चिंचवडे यांचे स्वागत समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी केले. प्रसिद्ध उद्योजक श्री. मिलिंद तेलंग यांचे स्वागत चित्रहस्तशिल्प कला विधा प्रमुख श्री. योगेश दीक्षित यांनी केले. तर मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री. प्रवीण चौधरी यांचे स्वागत चित्रहस्तशिल्प कला सह विधा प्रमुख श्री. रमेश खडबडे यांनी केले.
सहभागी कलाकार सौ. आरती एम., सौ. भारती भगत, श्रीमती शैलजा जाधव, सौ. वैशाली गायकवाड, कु. हर्षित पाटील, कु. स्वराली भालेकर व कु. मृदुल झामरे यांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
समितीचे सचिव सौ. लीना आढाव यांनी ‘संस्कार भारती’च्या कार्याची व सर्व विभागांच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. उद्घाटक सौ. वसुधा कुलकर्णी, श्री. शेखरजी चिंचवडे, श्री. मिलिंद तेलंग, श्री. प्रवीण चौधरी व सर्व उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले. सर्व सहभागी कलासाधकांच्या कलाकृती पाहून आनंद व्यक्त केला. ‘संस्कार भारती’च्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व सर्व कलासाधकांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
चित्रकार सौ. वसुधा कुलकर्णी व सामाजिक कार्यकर्ते श्री. शेखरजी चिंचवडे यांनी ‘स्मृतिरंग ७५’च्या स्मरणिकेसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली व श्री. शेखरजी चिंचवडे यांनी भारतमातेची प्रतिमा ‘संस्कार भारती’ला सप्रेम भेट दिली.
‘पी. एन. गाडगीळ ॲण्ड सन्स’चे कलादालन कलासाधक व कलारसिकांनी तुडुंब भरले होते. कलासाधक श्री. भाग्येश अवधानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कलासाधक श्री. रूपकांत जोशी यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रांत प्राचीन विधा संयोजक सौ. विनिता देशपांडे, ‘संस्कार भारती’, पिंपरी-चिंचवड समितीचे सचिव सौ. लीना आढाव, समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, कलासाधक व कलारसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
‘स्मृतिरंग ७५, ( पुष्प १७)’ हे प्रदर्शन सर्व कला रसिकांसाठी रविवारपर्यंत (ता. २२) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी पी. एन. गाडगीळ कलादालन, चिंचवडगाव येथे विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनात कलाकारांच्या विविध माध्यमातील सुंदर कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. तरी जास्तीत जास्त रसिकांनी प्रदर्शनास भेट देऊन स्वातंत्र्याच्या स्मृतींमध्ये रंगून जावे.
रविवारी (ता. २२) सायंकाळी सहा वाजता कु. करण गायकवाड यांचे चारकोलचे प्रात्यक्षिक होणार आहे. याचाही कला रसिकांनी लाभ घ्यावा.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील