मुंबई, २९ ऑक्टोंबर २०२०: राज्यात सर्वसामान्यांना परवडेल अशा दरांत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देत त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात दिवाळी सारखा मोठा सण येत आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने दि. ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असून, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.
दिवाळीत एसटी प्रवास सुलभ आणि सुसह्य व्हावा यासाठी एसटी महामंडळाने जादा फेऱ्यांचे नियोजन केले असून याबाबत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी तपशीलवार माहिती दिली आहे. आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही महामंडळातर्फे त्यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्या सुरु करण्याचं नियोजन केलं आहे. अर्थात, राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना आणि नियमांचे काटेकोर पालन करीत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून देण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे