दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी होणार सहभागी

नवी दिल्ली, २२ ऑगस्ट २०२३ : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती साईरिल रामफोसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिक्स शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. त्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. १५ व्या ब्रिक्स परिषदेलाच्या या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, यादरम्यान मोदी काही सदस्य देशांशी, द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. पीएम मोदींसोबत एक व्यावसायिक शिष्टमंडळही जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने २१ ऑगस्ट रोजी ही माहिती दिली आहे. यापूर्वी पीएम मोदी जुलै २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले होते. ब्रिक्स परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही उपस्थित राहणार आहेत. अशा परिस्थितीत पीएम मोदी त्यांची भेट घेऊ शकतात. खरं तर, ब्रिक्स गटात भारताव्यतिरिक्त चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचाही समावेश आहे.

१४ वर्षांपूर्वी २००९ मध्ये स्थापन झालेल्या BRICS या समूहाची बैठक यावेळी अत्यंत महत्त्वाची मानली जाते याचे एकमेव कारण म्हणजे या संस्थेचे सदस्य होण्याची स्पर्धा. सुमारे ४० देशांनी या संघटनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये सौदी अरेबिया, तुर्की, पाकिस्तान आणि इराणचा समावेश आहे. या बैठकीचा केंद्रबिंदू गटाचा विस्तार हा असेल. या बैठकीत ४५ अतिथी देश सहभागी होऊ शकतात. शिखर परिषदेनंतर आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवाद होईल. त्यात दक्षिण आफ्रिकेने आमंत्रित केलेल्या इतर देशांचा समावेश असेल. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विनय क्वात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिक्स समिटमध्ये ग्लोबल इकॉनॉमिक रिकव्हरी, जिओ पॉलिटिकल चॅलेंज आणि काउंटर टेररिझम यावर चर्चा होणार आहे.

ब्रिक्स परिषद मध्ये समाविष्ट असलेल्या देशांची कोरोनानंतर ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. कोरोनाच्या काळामध्ये ही बैठक ऑनलाईन माध्यमातून झाली होती. परंतु आता कोरोनानंतर ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक पार पडणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींनी सर्व देशांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित केले आहे. Pmo कार्यालयाने दिलेल्या माहिती नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ ते २४ ऑगस्टपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांच्या निमंत्रणामुळे पंतप्रधान मोदी हे ग्रीसचा देखील दौरा करणार आहेत. ४० वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान हे ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा