पुणे, २४ ऑक्टोबर २०२० : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या ‘अटल’ बस सेवेचा आज शुभारंभ झाला. कोथरूडचे आमदार व भाजपा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.
या योजनेअंतर्गत पीएमपीएमएलने पुणे शहरातील गर्दीच्या व अरूंद ९ मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी ९७ बसेसचे संचलनाचे नियोजन केले आहे. तसेच डेपो अंतर्गत टर्मिनल एकुण ५३ मार्गावर १४३ बसेसचे संचलनाचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना ५ रू. दरात ५ कि.मी. अंतराचा सुखकर प्रवास करता येईल. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी दर ५ मिनीटांनी बसेस उपलब्ध असतील.
रस्त्यावरच ट्रॅफिक कमी करायचं असेल तर चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा देणं आवश्यक आहे. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार असेल, तर लोक नक्की या सुविधेचा वापर करतील असा मला विश्वास आहे. असे मत या वेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, सभागृह नेते धीरज घाटे, आयुक्त विक्रमकुमार, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे