पणजी, २९ जून २०२३: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. लाखो हरिभक्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जमलेले असतानाच गोव्यातील प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखळी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्येही भाविकांची गर्दी झालीय. गोव्याचे नगर विकास व आरोग्य खात्यांचे मंत्री विश्वजित राणे यांनी आज पारंपरिक पद्धतीने विठ्ठल-रुक्मिणीचे पुजन केले.
आज पहाटे विश्वजित राणे यांनी भिरोंडाचे सरपंच व देवस्थानचे महाजन उदयसिंह राणे यांच्यासोबत, विठ्ठल-रुक्मिणी आणि राही या देवतांना अभिषेक घालून विधिवत पुजा केली. गेली अनेक वर्षे गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले विश्वजित राणे यांचे वडील प्रतापसिंह राणे हे विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करायचे. यावेळी राणे कुटुंबीयांची मालकी असलेल्या या मंदिरात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही पुजा पारंपरिक पद्धतीने केली.
गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यामध्ये पारंपरिक दिंडी स्पर्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. सुमारे ६० ते १०० लोक यातील एका दिंडीपथकांत सहभागी असतात. विविध पद्धतीने दिंड्या सादर होतात. या स्पर्धेमुळे गायन, पखवाज व टाळ यांच्यासह नृत्याचीही जुगलबंदी पहायला मिळते.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर