महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीची प्रारंभिक बैठक संपन्न

पुणे, २० जानेवारी २०२१: आज विधानभवनात महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीची प्रारंभिक बैठक आमदार चेतन तुपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून महाराष्ट्र शासन साजरा करत आहे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर अधिक प्रमाणात करणे व मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करूनही अनेक वर्षांपासून केंद्र सरकार टाळाटाळ करत आहे. त्याचा पाठपुरावा प्राधान्याने समिती करणार आहे.

दुकानांवर मराठी नावांच्या पाट्या असणे कायद्याने बंधनकारक असतांनाही अनेक ठिकाणी पळवाटा काढून इंग्रजी नाव मोठे व मराठी छोटे टाकणे असे प्रकार सर्रास होत आहे. हे टाळण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. प्रस्तावित मराठी भाषा भवनाच्या जागेबाबत मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत मराठी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबत चर्चा करून भाषा संवर्धनाबाबत त्यांची मते जाणून घेतली. आजच्या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

सदर बैठकीस विधिमंडळातील मराठी भाषा समितीचे सदस्य आमदार अजय चौधरी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सुनील राणे, आमदार मुक्ता टिळक, आमदार दिवाकर रावते, आमदार विक्रम काळे तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, उप-सचिव मेघना तळेकर, कक्ष अधिकारी अलका पराडकर, मराठी भाषा विभाग सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, सह-सचिव मिलिंद गवादे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सचिव मीनाक्षी पाटील, राज्य मराठी विकास संस्था संचालक संजय पाटील यावेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा