अहमदाबाद, २८ डिसेंबर २०२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने अहमदाबादला रवाना होण्याची शक्यता आहे. अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात त्यांना दाखल केले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीम त्यांना हिराबेन मोदी यांच्याबद्दलची सर्व माहिती पोचवत आहे. यातच काँग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना ट्विट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची आई यांच्यातील नाते काही वेगळेच आहे. जूनमध्ये मातोश्रींचा ९९ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी ‘आई’ नावाचा भावनिक ब्लॉगही लिहिला होता. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये असतानाही पंतप्रधानांनी त्यांच्या मातोश्रींची भेट घेतली होती. एवढेच नाही, तर नरेंद्र मोदी त्यांच्या आणि त्यांच्या मातोश्रींच्या नात्याबद्दल सतत बोलत असतात. म्हणूनच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलासा देत ट्विट केले आहे.
राहुल गांधी यांचे ट्विट-
आई आणि मुलगा यांच्यातील प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य असते.
मोदीजी, या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की तुमच्या मातोश्री लवकरच बऱ्या होतील.
त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींवर डॉक्टर उपचार करीत असून, त्यांची प्रकृती स्थिरावली असल्याची माहिती यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरने दिली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे