राजस्थानचे मंत्री राजेंद्र गुढा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जयपूर, ९ सप्टेंबर २०२३ : लाल डायरीवरून राजस्थान सरकारविरोधात मोर्चे काढणारे बरखास्त मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्र गुढा यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या मूळ गावी गुढा येथे पक्षात सामील झाले. यावेळी शिंदे यांनी अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, वर्षभरापूर्वी गेहलोत म्हणाले होते की, गुढामुळे मी मुख्यमंत्री आहे, आता त्यांना बरखास्त केल आहे.

गेहलोत यांनी जे केले त्याचे उत्तर जनता देईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. गुढा यांनी कोणती चूक केली? सत्याचे समर्थन करणे योग्य नाही का? राजस्थानमधील कायदा आणि सुव्यवस्था आणि महिलांवरील अत्याचारांबाबत त्यांनी फक्त आवाज उठवला होता. शिंदे म्हणाले की, गुढा यांनी मंत्रीपद सोडले, पण सत्य सोडले नाही. तुमच्याप्रमाणे मीही मंत्रीपद सोडले होते. बाळासाहेबांच्या आदर्शासाठी मी मंत्रीपद सोडले होते. राजस्थानचे शौर्य आणि महाराष्ट्राचे शौर्य यांचे मिलन आनंददायी असल्याचे ते म्हणाले.

गुढा यांनी मंत्री असताना जुलैमध्ये विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. विधानसभेत काँग्रेस आमदारांनी मणिपूर हिंसाचार आणि मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पण या मुद्द्यावर बोलताना राजेंद्रसिंह गुढा यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला होता. बलात्काराच्या बाबतीत राजस्थान प्रथम आहे. मणिपूरबद्दल बोलण्यापूर्वी आपण स्वतःच्या घरात डोकावलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी गहलोत सरकारवरच ताशेरे ओढले होते. काँग्रेस आमदारानं आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केल्यानं काँग्रेसच्या विधानसभेत अस्वस्थता निर्माण झाली होती. हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गुढा यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. पक्षाकडून बडतर्फ केल्यानंतर गुढा यांनी विधानसभेतच एक ‘लाल डायरी’ दाखवून आपल्याच पक्षाच्या सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला होता.

आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड यांच्या घरावर पडलेल्या इनकम टॅक्सच्या छाप्यांपूर्वी ही लाल डायरी आणण्यात आली होती, असा दावा राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत केला होता. त्या दिवशी राजस्थानच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. लाल डायरीबाबत गुढा यांनी गेहलोत सरकारविरोधात सातत्यानं आरोपांची माळच लावली होती. गुढा यांनी लाल डायरीची तीन पानंही प्रसिद्ध केली होती, ज्यात आरसीए निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता. तेव्हापासूनच भाजपनं सातत्यानं लाल डायरी हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या सभांमध्ये अमित शहांपासून जेपी नड्डा यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यानं लाल डायरीच्या मुद्द्यावरून गेहलोत सरकारला घेरलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा