मुंबई, २७ जुलै, २०२२: आज उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रामदास कदम यांचाही वाढदिवस आहे. यावर त्यांनी उद्धव ठाकरें यांच्यावर प्रतिवार केला आहे. त्यांनी आरोप करताना सांगितलं की, कालची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी होती. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि उद्धव ठाकरे उत्तर देणार. हे सर्व हस्यास्पद आहे
महाराष्ट्रात गद्दार, हरामखोर ही भाषा उद्धव ठाकरे यांची राहिली आहे. ती भाषा वापरताना पहिल्यांदा तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करून बघा. कोण गद्दार आहे? ते शोधा… 51 आमदार का जातात? 12-14 खासदार का जातात? याचे आत्मपरिक्षण करण्याची आता उद्धव ठाकरेंना गरज आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
“उद्धव ठाकरे दुजाभाव करतात. मराठा नेत्यांना त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना संपवायचं आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत”, असे गंभीर आरोप रामदास कदम यांनी केले आहेत.
आज रामदास कदम आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा आपली खदखद बाहेर काढली. मागची 3 वर्षे शिवसेनेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मला बोलू दिलं नाही. माझ्या खात्याअंतर्गत घेण्यात आलेले निर्णय आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले, असे आरोप कदम यांनी केले आहेत.
आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिंदेगटातील आमदार शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न करता, माजी मुख्यमंत्री म्हणत शुभेच्छा दिल्या. मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं असतं. पण ते आज बाळासाहेबांचे सुपूत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारानुसार ते काम करत आहेत, त्यामुळे मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणू इच्छित नाही, असं रामदास कदम यांनी सांगितलं.
यावरुनच पुन्हा एकदा रामदास कदम यांच्या मनतली सल बाहेर आली. पण याचे परिणाम नक्की होणार, हे देवालाच ठाऊक असावं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस