पुणे, दि.२७ एप्रिल २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. त्यात सलून व्यवसायही धोक्यात आला आहे. सरकारने लॉक डाऊन काळात सोशल डीस्टंशिंग करण्यात सांगितले असतानाही काही सलून व्यवासायिक मात्र घरी जाऊन नागरिकांचे केस कापून देताना दिसत आहेत. मात्र यामुळे त्या व्यावसायिकाला कोरोनामुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा सलून व्यावसायिकांनी अशी जोखमीची कामे करणे टाळावे असे आवाहन सलून व्यवासायिक प्रदीप जाधव यांनी इतर सलून व्यवसायिकांना केले आहे.
अधिक माहिती देताना प्रदीप म्हणाले की, सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेणे गतजेचे आहे. कारण कोरोना विषाणूचा आजार भयानक असून वेळेत उपचार नाही मिळाले तर आपल्याला जीव देखील गमवावा लागू शकतो. सलून व्यावसायिकांना माझं एक सांगणं आहे की, तुमच्या संकटाच्या काळात कुणी तुम्हाला मदतीसाठी विचारले आहे का? कुणी तुम्हाला काही धान्य किट वैगेरे असे काही देतो म्हणून कुणी विचारले का? तर माझ्या अनुभवानुसार तरी नाही. त्यामुळे तुम्ही हे जे काही घरी जाऊन काम करत आहात. त्याने तुमच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
याशिवाय जोपर्यंत लॉक डाऊन आहे. तोपर्यंत घरातच रहा, कुटुंबाला वेळ द्या. जर या कामामुळे तुम्हाला काही धोका निर्माण झाला तर तुमच्या कुटुंबीयांचा काय? याचा विचार करा? जर आपल्या या चुकीच्या वागण्यामुळे इतर व्यावसायिकांनाही अडचण निर्माण होऊ शकते. सरकारने जर आपल्या व्यवसायावर निर्बंध आणले तर, आपल्या वस्तू देखील सरकार काही काळासाठी ताब्यात घेऊ शकते. त्यामुळे जे कुणी असा व्यवसाय करत आहात. त्यांना माझं सांगणं आहे की, ते सर्व थांबवावे अन्यथा मोठ्या परिणामांना आपल्या सर्वांना सामोरे जावे लागेल. असेही प्रदीप जाधव यांनी “न्युज अनकट”शी बोलताना सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर