संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिला, विरोधी पक्षाचे सध्या गलिच्छ राजकारण सुरु: उद्धव ठाकरे

मुंबई, १ मार्च २०२१: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे भाजपकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यानंतर संजय राठोड यांनी आपला राजीनामा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. याबाबत वक्तव्य करताना ठाकरे म्हणाले की, “न्यायाने वागणे ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचेच आहे म्हणून काम केले जातेय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असे म्हटले जातेय. मात्र, तसे होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिला आहे.”
तुमच्या काळातही हीच तपास यंत्रणा होती : उद्धव ठाकरे
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. गुन्हा दाखल करुन मोकळे होणे म्हणजे न्याय देणे असे होत नाही. ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्यात. कालबाह्या तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, कुणालाही पाठिशी घालणार नाही. नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा होती.”
…तर मी आधी शिवसैनिक, संजय राठोड यांचे पत्र
दरम्यान संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे, त्यात ते म्हणाले आहेत की, “मा. उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथितपणे हे पत्र लिहित आहे. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूबाबत खरे बाहेर यावे. पूजा चव्हाणच्या कुटुंबाचीही बदनामी होत आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी मी आधी शिवसैनिक आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होऊपर्यंत मी मंत्रिपदावर राहणे नैतिक नाही, म्हणून राजीनामा देत आहे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा