पुण, १५ जानेवारी २०२३ : एरंडेल (जि. जळगाव) येथे सर्पमित्र मुकेश शिवनारायण सोनार, जगदीश केदारनाथ बैरागी, राजेश विठ्ठल सोनवणे यांनी आपल्या युवा मित्रांसह गुरुवारी (ता. १२ जानेवारी) दुपारी शहरात नायलॉन मांजाविषयी प्रबोधन फेरी काढून जनजागृती केली.
मकर संक्रात सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याचा खेळ खेळला जातो. नायलॉन मांजामुळे पक्षी व मानवी जीवितास दुखापत होते. काही प्रसंगी त्या दुखापती प्राणघातक ठरतात. पतंगासह तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडतात. नायलॉन मांजाचे तुकडे हे लवकर विघटन होण्याजोगे नसल्याने गटारे व नदी-नाल्यांसारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात; तसेच नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे प्राण्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशा धाग्यांमधील प्लास्टिकच्या वस्तूंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरते.
दरम्यान, एरंडोल शहरातील पतंग विक्रेत्यांना युवकांतर्फे मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले; तसेच काही ठिकाणी लहान मुले खेळत असताना त्यांच्याकडे नायलॉन मांजा आढळला असता, त्यांच्याकडून घातक मांजा जमा करून घेत खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी पशुपक्षी, प्राणी यांना होणारा मांजाचा त्रास लहान मुलांना समजावून सांगण्यात आला. या उपक्रमास विक्रेते, लहान मुले व नागरिकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. एरंडोल येथे पतंग विक्रेत्यांनी यापुढे नायलॉन मांजा विक्री न करण्याचा, तसेच लहान मुलांनी नायलॉन मांजा न वापरण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे लवकरच एरंडोल शहरातून नायलॉन माजा हद्दपार होणार आहे.
हा उपक्रम राबविणारे युवक वन्यजीव संरक्षण संस्थेशी जोडलेले आहेत. मुलांकडून जमा केलेला मांजा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेवरून जाळून नष्ट करण्यात आला आणि नागरिकांमध्ये एक चांगला संदेश गेला. नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. नायलॉन मांजाच्या धाग्याच्या दुष्परिणामांबाबत शाळा, महाविद्यालय; तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करावी. सर्व नागरिकांनी निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही युवकांतर्फे करण्यात आले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील