रत्नागिरी २४ नोव्हेंबर २०२३ : कोकणातून नामशेष होणाऱ्या लांबड्या काळ्या तिळावर कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राने यशस्वी संशोधन केले आहे. संशोधनातून वाचवण्यात आलेली ही काळ्या तिळाची जात, मे २०२४ मध्ये शेतकऱ्यांसाठी प्रसारित होण्याची शक्यता आहे. पुर्वीच्या काळ्या लांब तिळाचे उत्पादन कमी कमी होत गेले. काळे तीळ ही जात नामशेष होऊ नये यासाठी संशोधन केंद्राने शेतकऱ्यांकडून काळ्या तिळाची जात मिळवून त्यातील निवडक तिळावर संशोधन करून हि जात वाचवली आहे. विकसीत केलेल्या या काळ्या तीळाच्या नवीन जातीमध्ये तेलाचे प्रमाण ४० ते ४२ टक्के असणार आहे. ही जात ९० ते १०० दिवसात तयार होईल. या तिळाचे तेल खाद्यासाठी आणि औषधांसाठीही वापरता येणार आहे.
१०३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिरगाव संशोधन केद्रातून काळ्या तिळावर हा पहिलाच प्रयोग असून तो अंतिम टप्यात आहे. पाच जिल्ह्यात काळ्या तिळावर चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली. कोकण कृषी विद्यापीठांतर्गत १९१३ ला शिरगाव संशोधन केंद्राची स्थापना झाली. केंद्रातर्फे शेतीविषयक संशोधन आणि विस्तार कार्य करण्यात येते. १०३ वर्षाच्या कार्यकाळात संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या भात, भुईमुग पिकाच्या विविध जाती शेतकऱ्यासाठी दिल्या आहे. तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले जात आहे. संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या भात जातीलाही जिल्ह्यात परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
गेल्या तीन वर्षांपासून कोकणात नामशेष होणारे लांबडे काळे तीळ यावर संशोधन केंद्रातून संशोधन सुरु होते. कृषी खाते, कृषी विज्ञान केंद्र पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधूदुर्ग अशा पाच जिल्ह्यामध्ये या काळ्या तिळावर शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी घेण्यात आली. लांबड्या काळ्या तिळाची तपासणीसाठी प्रयोग घेण्यात आले. मे २०२४ मध्ये ही जात शेतकऱ्यांसाठी प्रसारित होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ही काळ्या तिळाची पहिलीच जात आहे. कोकणात पुर्वी पासून ही काळ्या लांब तिळाची जात होती. पण त्यावर उत्पादन कमी झाले. त्यामुळे घरगुती जुने घाणेही बंद पडले. त्यामुळे स्वच्छ तेल ही काळाच्या पडद्याआड झाले. काळे लांबडे तीळ आणि जवस हे दुर्लक्षीत पीक झाले. काळे तीळ ही जात नामशेष होऊ नये यासाठी संशोधन केंद्राने कंबर कसली शेतकऱ्यांकडून काळ्या तिळाची जात मिळवून त्यातील निवडक तिळावर केंद्रातून संशोधन करण्यात आले. शेतकऱ्यांनीही मदत केली. गेली दोन ते तीन वर्षे यावर संशोधन सुरु होते. पाच जिल्ह्यात घेण्यात आलेल्या चाचणीतून ५०० किलोच्या आसपास उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.
भात जातीच्या वाणाला शेतकऱ्यांकडून मागणी-
शिरगाव कृषी संशोधन केंद्राने या आधी भात जातीवर काम करुन भात बियाण्याच्या ११ जाती आणि एक संकरित वाण सह्याद्री -५ हे निर्माण केले आहे. सह्याद्री-५ ला शेतकऱ्यांकडून मागणी आहे. यामध्ये रत्नागिरी-८, रत्नागिरी-२४, रत्नागिरी-१, रत्नागिरी-६, रत्नागिरी-७ (लाल तांदूळ) या जातींचे बियाणे मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात येते. तसेच भुईमुग पिकाच्या विविध जाती, कोकण टपोरा, भुरत्न, कोकण गौरव अशा भुईमुगाच्या जातील संशोधन केंद्राने शेतकऱ्यासाठी दिल्या आहे. सद्यस्थितीला केंद्राकडे १२ भात जाती उपलब्ध आहेत. मात्र अलीकडे कृषी संशोधन केंद्रातून लोकप्रिय शेतकऱ्यांच्या आवडीच्या रत्नागिरी-१, रत्नागिरी-२४, रत्नागिरी ६ (लाल दाणे), रत्नागिरी-७, रत्नागिरी-८ (सुवर्णा) आदी जातींचा समावेश असून दिवसेंदिवस विद्यापीठाने विकसित केलेल्या भात बियाण्याची मागणी वाढते असून शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ झाली आहे.
काळ्या तिळाची शेती शेतकऱ्यांसाठी वरदान-
जिल्ह्यात माकडाच्या उपद्रवाशी शेतकरी झुंजत आहे. त्यावर कोणतीही उपाय योजना नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी वरकस शेती करणे देखील सोडले आहे. त्यामुळे दुर्लक्षीत पिकांकडे शेतकऱ्यांकडून उत्पादन होत नाही. मात्र या काळ्यातीळाचे डोंगर उतारावर व मध्यम रेवटाळ अथवा वरकस जमीनीत उत्पादन केल्यास माकडांचा त्रास होत नाही. काळ्या तीळाकडे माकड ढुंकूनही पाहात नाही. त्यामुळे या तीळाची शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. नवीन काळ्या तिळ या जातीसाठी मातीचा पोत उताराचा असणे गरजेचा आहे. ज्यामध्ये पाण्याची साठवण असणार नाही. डोंगर उतारावर हे पीक जास्त प्रमाणात येईल. खडकाळ मध्य अशी जमीन या पिकासाठी उपयुक्त, पाण्याचा निचरा होणारी. याचे उत्पादन दोन्ही हंगामात शेतकरी घेऊ शकतात.
भारत सरकार ऑईल सेसमध्ये खायचे तेल आयात करतो. भारतात भुईमुग, सोयाबीन यांचे तेल बाजारात मिळते पण दुर्लक्षीत पारंपरीक पीक काळेतीळ यावर लक्ष देण्याची गरज होती. या पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येथील कृषी संशोधन केंद्रातर्फे यावर संशोधन करण्यात आले. पाच जिल्ह्यात याची चाचणी घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीतील या नवीन काळ्या तिळाची शेती केल्यास उत्पादन वाढ होईल. असे मत डॉ.विजय दळवी, प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र शिरगाव-रत्नागिरी यांनी व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर