मुंबई, 26 जून 2022: बाळासाहेबांच्या नावाच्या गैरवापराच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या पत्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही लोक महाराष्ट्रात पक्षविरोधी कारवाया करत आहेत, असं लिहिलंय. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या व्यासपीठावरून ते आमदारही झाले आहेत. ते शिवसेनेच्या तत्त्वांना बाधा पोहोचवू शकतात, अशी भीती मला वाटते. बंडखोर आमदार ‘शिवसेना’ किंवा बाळासाहेबांच्या नावाचा गैरवापर करून नवा राजकीय पक्ष स्थापन करून संभ्रम निर्माण करू शकतात, असाही आम्हाला संशय आहे. असं त्यांनी पत्रात लिहिलंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कार्यकारिणी बैठकीनंतर सांगितलं की, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना (बंडखोर आमदार) माफ केले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आलाय. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी कोणी किंवा पक्षाने गैरवापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
दरम्यान काल शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत देखील असं स्पष्ट करण्यात आलं की, आमच्याकडं बहुमत आहे. आमच्या या आमदाराच्या गटाला काहीतरी नाव असणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही तसा विचार करत आहोत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे