निलेश देशमुख यांना मनुष्यबळ विकास अकादमीचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

माढा,३ ऑक्टोंबर २०२०: माढा तालुक्‍यातील तांबवे टें येथील निलेश शशिकांत देशमुख यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने देण्यात येणारा सन २०२० राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. देशमुख सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात १२ वर्षे काम करताना गुणवंत पण गरीब विद्यार्थ्यांना स्टुडन्टस फ्रेन्ड्स क्लबच्या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतले असून जवळपास ५०० गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत आलेले आहेत.

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सुरू केलेला ‘डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन कट्टा’ हा उपक्रम प्रशंसनीय ठरला आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान राहिलेले आहे. त्यांनी कोरोना विषाणु संक्रमणाच्या संकटकाळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आर्थिक परिस्थिती गरीब असलेल्या विद्यार्थांना अॉनलाईन शिक्षणासाठी वैयक्तिक व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार अंतिम निवड फेरीत त्यांच्या कलागुणांची व त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला. त्यांना पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन २०२० मध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. निलेश देशमुख यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या भरीव कामगिरीची दखल मनुष्यबळ विकास अकादमीने घेतली. त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.या अगोदरही त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा