परवानगीशिवाय दाढी ठेवल्या बद्दल उपनिरीक्षकास केले निलंबित…

बागपत ( उत्तर प्रदेश), २३ ऑक्टोंबूर २०२०: यूपीच्या बागपत जिल्ह्यात तैनात उत्तर प्रदेश पोलिसातील सब इन्स्पेक्टर इंतेसर अली यांना परवानगी न घेता दाढी ठेवल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. त्यांना पोलिस लाइनमध्ये पाठविण्यात आले आहे. अली यांना दाढी वाढविण्यावरुन तीन वेळा इशारा देण्यात आला होता तसेच दाढी वाढवायची असल्यास त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे देखील सांगितले होते. तथापि, पोलिस कर्मचार्‍यांनी परवानगी घेतली नाही आणि दाढी वाढविणे सुरूच ठेवले.

हे प्रकरण बागपत जिल्ह्यातील रमाला पोलिस स्टेशन मधील आहे. जेथे पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक इंतेसर अली यांना एसपी बागपत यांनी विभागाची परवानगी न घेता दाढी ठेवल्याबद्दल निलंबित केले आहे. तीन वेळा सूचना देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत बागपतचे एसपी अभिषेक सिंह म्हणाले की, इंतेसर अली विभागाच्या परवानगीशिवाय दाढी ठेवत होते. त्यांना अनेक वेळा दाढी मुंडन करण्याची सूचना देण्यात आली. असे असूनही, उपनिरीक्षक त्यांच्या सूचनांचे पालन करीत नव्हते. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

एसपी अभिषेक सिंह म्हणाले की, पोलिसांच्या नियमावलीनुसार केवळ शीखांना दाढी ठेवण्याची परवानगी आहे, तर इतर सर्व पोलिसांना त्यांचे चेहरे दाढी काढलेले ठेवावे लागतील. एसपी म्हणाले, “जर एखाद्या पोलिस कर्मचार्‍याला दाढी ठेवायची असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागेल. इतेसर अली यांना वारंवार परवानगी घेण्यास सांगितले गेले. परंतु त्यांनी त्याचे पालन केले नाही आणि परवानगीशिवाय दाढी ठेवली.”

अली हे सब-इंस्पेक्टर म्हणून पोलिस दलात रुजू झाले आणि गेली तीन वर्षे बागपतमध्ये तैनात होते. या मुद्यावर अली म्हणाले की, त्यांनी दाढी ठेवण्याची परवानगी मागितली होती, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या घटनेची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा