52 किमी दूर बसलेल्या शत्रूवर कोसळेल मृत्यू, या भारतीय तोफेची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली, 3 मे 2022: भारतीय तोफखान्याची ताकद आता अनेक पटींनी वाढणार आहे. कारण सैन्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे 155 mm/52 कॅलिबर अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS) ची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही तोफ नेऊन कुठेही तैनात करता येते. मग ती पाकिस्तानची सीमा असो किंवा चीनच्या सीमेजवळील लडाख असो.

DRDO च्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE), Tata Advanced Systems Limited, Mahindra Defence Naval Systems आणि Bharat Forge Limited यांनी ATAGS बनवण्यासाठी एकत्र काम केलंय. राजस्थानमधील पोखरणसह इतर अनेक ठिकाणीही या तोफेची चाचणी घेण्यात आली. गोळ्यांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. या तोफेने अचूकतेने लक्ष्य गाठलं. या तोफेच्या कमाल मर्यादेपर्यंत शेल डागण्यात आले आहेत.

भारतीय लष्कराकडं सध्या या 155 मिमीच्या 7 तोफा आहेत. त्याची पहिली चाचणी 2016 मध्ये झाली होती. 40 तोफा मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय आणखी 150 तोफा बनवल्या जाणार आहेत. ही तोफ संचलित चालवण्यासाठी 6 ते 8 लोकांची गरज आहे. बर्स्ट मोडमध्ये 15 सेकंदात 3 राउंड, तीव्रतेमध्ये 3 मिनिटांत 15 राउंड आणि 60 मिनिटांत 60 राउंड फायर होतात. त्याची फायरिंग रेंज 48 किमी आहे. मात्र ती 52 पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या तोफेचं वजन 18 टन आहे. त्याची ट्यूब म्हणजेच बॅरलची लांबी 8060 मिलीमीटर आहे. ही तोफ उणे 3 अंश ते अधिक 75 अंशापर्यंत उंची घेऊ शकते. HE-BB किंवा हाय एक्स्प्लोझिव्ह बेस ब्लीड अॅम्युनिशन बसवले तर त्याची रेंज 52 किमी पर्यंत वाढते. यात थर्मल दृष्य आणि गनर्स डिस्प्ले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा