नगरमध्ये मुळा धरणातून आजपासून उन्हाळी आवर्तन सुरू

नगर, १ मार्च २०२३ : गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न पुढे आला होता. त्यामुळे मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन मिळावे, अशी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी होती. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुळा पाटबंधारे विभागाला सूचना केल्या होत्या.

त्यानुसार आज बुधवारपासून (ता. १ मार्च) मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले जाणार आहे. हे आवर्तन १५ एप्रिल २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. सध्या मुळा धरण लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी ऊस, कांदा, गहू, मका; तसेच चारा पिकांची लागवड केली आहे; मात्र जानेवारी अखेरपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पाण्याची पातळी घटत आहे. फेब्रुवारीमध्ये या झळा तीव्र बनल्या आहेत.

शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन तत्काळ आवर्तनाचे नियोजन करावे, अशा सूचना खासदार सुजय विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार उन्हाळी आवर्तनाचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. ता. १ मार्च ते ता. १५ एप्रिल २०२३ या कालावधीत हे आवर्तन सोडले जाणार आहे. या माध्यामातून लाभक्षेत्रातील अंदाजे ३० हजार हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा