नाशिक, २१ डिसेंबर २०२२ : ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणार्या ‘अक्षरबंध साहित्य पुरस्कारां’चा वितरण सोहळा रविवारी (ता. २५) होणार आहे. प्रसिद्ध कवी, सिनेगीतकार प्रकाश होळकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर, विजयकुमार मिठे, प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, विवेक उगलमुगले, यशवंत पाटील, किरण भावसार, राजू देसले, प्रा. डॉ. प्रकाश शेवाळे, प्रा. विद्या सुर्वे आणि प्रशांत भरवीरकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
‘अक्षरबंध प्रतिष्ठान’च्या निवड समितीने यापूर्वीच ‘अक्षरबंध साहित्य पुरस्कारां’ची घोषणा केली आहे. यात ज्योती सोनवणे (दमकोंडी कथासंग्रह) यांना अक्षरबंध उत्कृष्ट कथासंग्रहासाठी, तर लक्ष्मण महाडिक यांना (स्त्री कुसाच कविता) अक्षरबंध सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह, रमेश रावळकर (टिश्यू पेपर, अक्षरबंध सर्वोत्कृष्ट कादंबरी), डॉ. स्मिता दातार (प्रभु अजि गमला- अक्षरबंध सर्वोत्कृष्ट चरित्र पुरस्कार), वीणा रारावीकर (आकाशवीणा- अक्षरबंध सर्वोत्कृष्ट ललित पुरस्कार), राजेंद्र उगले (थांब ना रे ढगोबा- अक्षरबंध सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार), प्रसाद ढापरे (इकिगाई- अक्षरबंध सर्वोत्कृष्ट अनुवाद पुरस्कार) आणि राजेंद्र राऊत (लीळाचरित्रातील कथनरूपे-अक्षरबंध सर्वोत्कृष्ट अनुवाद पुरस्कार) या साहित्यकांच्या साहित्यकृतींचा समावेश आहे; तसेच ‘अक्षरबंध जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ साहित्यिक शंकर कापडणीस, तर ‘अक्षरबंध साहित्यरत्न’ या पुरस्काराने निशा डांगे यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे; तसेच या कार्यक्रमात ‘अक्षरबंध’तर्फे झालेल्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
हा कार्यक्रम नाशिक-ओझर रोडवरील पुस्तकांचे हॉटेल- आजीचे वाचनालय या ठिकाणी सकाळी दहा वाजता होणार असून, साहित्यिक व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रवीण जोंधळे, उपाध्यक्ष सप्तर्षी माळी, सचिव साई बागडे, तसेच पदाधिकारी सुवर्णा घुगे, कल्याणी बागडे, डॉ. गणेश मोगल, योगेश विधाते आदींनी केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील