भारत आणि कॅनडा संबंधांमध्ये तणाव वाढला, कॅनडा सरकारकडून नागरिकांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी

नवी दिल्ली, २० सप्टेंबर, २०२३ : खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधील राजनैतिक वाद वाढत आहे, त्यातच भारत आणि कॅनडा संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. अशातच कॅनडा सरकारनं पुन्हा एकदा भारताला डिचवलं आहे. कॅनडातील नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. त्यात भारतातील केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरचा प्रवास टाळण्याचा सल्ला कॅनडा नागरिकांना दिला आहे.

कॅनडा च्या वृत्तसंस्थेने कॅनडा सरकारच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती पाहता कॅनडाने आपल्या नागरिकांना तेथे न जाण्यास सांगितले असुन दहशतवाद आणि अपहरणाचा धोका असल्याचे नमूद केलं आहे. याशिवाय आसाम आणि मणिपूरमध्येही न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे आधी जारी केलेल्या ॲडव्हायझरीचे अपडेशन होते. तसेच कॅनडातील सर्वात मोठे वृत्तपत्र ‘टोरंटो स्टार’ने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे विधान प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, कॅनडाच्या सरकारला भारतासोबत तणाव वाढवायचा नाही, पण भारताला हे मुद्दे गांभीर्याने घ्यावे लागतील

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचं कॅनडाच्या संसदेला संबोधिक करताना म्हणाले होते. तेव्हापासून संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. अशातच भारतानं कॅनडाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य फेटाळून लावलं आहे. त्यावरुन कॅनडा आणि भारत यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. कॅनडानं केवळ आरोपच केले नाहीत, तर भारतीय राजदूतांची देशातून हकालपट्टीही केली होती. अशातच आता कॅनडानं नवी अॅडव्हायजरी जारी करत वादात आणखी भर टाकली आहे.

कॅनडाने केलेले सर्व आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- कॅनडाचे सर्व आरोप हास्यास्पद आहेत. असेच आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधान मोदींवर केले होते आणि ते पूर्णपणे फेटाळले गेले. असे बिनबुडाचे आरोप म्हणजे खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेकी यांच्यापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना कॅनडात अभय देण्यात आले असून ते भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला धोका आहे.

हरदीप सिंह निज्जर कोण होता?
४५ वर्षीय हरदीप सिंग निज्जर हा प्रतिबंधित केटीएफचा (खलिस्तान टायगर फोर्स) प्रमुख होता आणि भारताकडून सर्वाधिक शोध घेतल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांपैकीच एक होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. पश्चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतामधील सरे येथील गुरुद्वाराबाहेर १८ जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. निज्जर हा जालंधरच्या भारसिंह पुरा गावचा रहिवाशी होता. १९९६ मध्ये तो कॅनडाला गेला होता, त्यानंतर त्यांनी कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम सुरू केलं. पण कालांतरानं तो खलिस्तानी कारवायांमध्ये सामील झाला. निज्जरला कालांतरानं कॅनडाचं नागरिकत्व मिळालं. त्यामुळेच त्यांच्या हत्येनंतर कॅनडातील काही शीख फुटीरतावादी संघटनांनी या हत्येचा तपास करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी निज्जरच्या हत्येबाबत संसदेत माहिती दिली. ते म्हणाले की, कॅनडाच्या नागरिकांची त्याच्या भूमीवर हत्या करणं हे सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत कॅनडा हे खलिस्तानी कारवायांचं केंद्र बनलं आहे. अनेक खलिस्तानी दहशतवादी येथे लपले आहेत असा भारताचा कयास आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा