पुणे, २ नोव्हेंबर २०२०: बारामती पुणे रस्त्यावरील कऱ्हावागज गावाकडून अंजनगावकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात पुलाचा भराव वाहून गेल्याने अनेक गावांची वाहतूक वाहिनी असणाऱ्या वाहतुकीला खीळ बसली आहे. तर गावकऱ्यांना बारा किलोमीटरचा वेढा मारून जावे लागते आहे. कऱ्हा नदीवरील पूल वाहून गेल्याने नागरिकांना वीस फूट उंच शिडीवरून जावे लागत आहे.
कऱ्हावागज गावातुन कऱ्हानदीवर असलेला साधारण वीस फूट उंचीच्या पुलाचा एका बाजूचा पुलाचा भराव तर दुसऱ्या बाजूचा अर्धा पूल वाहून गेला आहे. चार वर्षापूर्वीच हा पूल बांधला होता. पुल पुढे अंजनगाव, जळगाव सुपे, सोनवडी, कारखेल, कऱ्हाटी व पाटस रोड कडे जाणाऱ्या गावांना जोडणाऱ्या पुलाचा भराव वाहून गेल्याने गावकऱ्यांना शिडीवरून वीस फूट खोल शिडी चढावी व उतरावी लागत आहे. तर नागरिकांना घरी जाण्यासाठी पाटस रस्त्यावरील बऱ्हाणपूर किंवा सोनवडी गावातून बारा किलोमीटर चा वेढा मारून जावे लागत आहे. पुर ओसरल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे, खासदार रामदास आठवले यांनी या पुलाची पाहणी करून लवकरात लवकर पुलाचे काम केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र काहीही हालचाल न दिसल्याने गावातील तरुणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार देऊन लवकर काम न झाल्यास उपोषणाचे निवेदन दिल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने एक दिवस जेसीबी मशीनच्या साहाय्याने येथील खड्डे बुजवले आणि परत इकडे फिरकलेच नसल्याचे संतप्त तरुणांनी सांगितले या पुलाला लावलेल्या शिडीवरून वृद्ध, महिला, लहान मूल दोरीचा आधार घेत ये जा करत आहेत. जर काही अपघात घडला तर एखाद्याच्या जीवावर बेतू शकते.
या रस्त्यावरून रोज साधारण पाच ते सहा हजार लोक प्रवास करतात तर व्यवसायासाठी, नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा वेढा मारून जावे लागते नाहीतर जीव धोक्यात घालून शिडीवरुन चढून जावे लागत असल्याची खंत नागरिकांनी सांगितली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: