मार्चच्या सुरूवातीलाच कोरोना बाबत केंद्र सरकारला मिळाली होती चेतावणी

नवी दिल्ली, २ मे २०२१: मार्चच्या प्रारंभी, भारतीय शास्त्रज्ञांच्या पॅनेलने केंद्र सरकारला धोकादायक, नवीन आणि प्राणघातक कोरोना व्हायरस प्रकाराबद्दल चेतावणी दिली होती, परंतु याकडे दुर्लक्ष केले गेले.  ब्रिटिश मीडिया इन्स्टिट्यूट द गार्डियन या वृत्तानुसार रॉयटर्स या वृत्तसंस्थेने हा अहवाल दिला आहे.  या अहवालानुसार कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदी घालण्याची गरज असल्याचे चार भारतीय शास्त्रज्ञांनी भारत सरकारला सांगितले होते.
रॉयटर्सने शनिवारी १ मे २०२१ रोजी वृत्तांत दिले की शास्त्रज्ञांनी हा इशारा दिल्यानंतरही कोट्यवधी लोक धार्मिक सण, क्रीडा स्पर्धांमध्ये आणि मास्क शिवाय राजकीय रॅलीमध्ये सामील झाले.  याशिवाय कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकऱ्यांचा निषेधही सुरूच होता.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरला.  देशातील कोरोनाची ही वाईट परिस्थिती ब्रिटनमधील व्हेरीएंट आणि त्यानंतरच्या दोन नवीन म्युटंट व्हेरीएंट मुळे  उद्भवली.
३० एप्रिल रोजी भारतात एका दिवसात कोरोना विषाणूची ४,०१,९९३ प्रकरणे समोर आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकरणे एकाच दिवसात समोर येणे हा एक विश्वविक्रम ठरला. याशिवाय गेल्या २४ तासात कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरीएंट मुळे ३५२३ लोक मरण पावले.  दरम्यान, गुजरातमधील भरुचमधील रुग्णालयात कोविड वॉर्डला आग लागल्याची बातमी समोर आली आहे.  यात १८ रुग्णांचा मृत्यू झाला.
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्वीकारल्यानंतर देशातील हे सर्वात मोठे संकट आहे.  कोरोना व्हायरस हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल जनता केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आवाज उठवत आहे.  रुग्णालयात बेड नाहीत.  रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता आहे.  स्मशान भूमी मध्ये देखील मृत्यू झालेल्या रुग्णांना अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाहीत. स्मशानभूमी बाहेर रांगा लागल्या आहेत.
उत्तर भारतातील एक संशोधन केंद्राचे संचालक, नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले की, भारतीय जेनेटिक कंसोर्टियम इन्साकॉगने मार्चच्या सुरूवातीलाच या नवीन प्रकाराबाबत चेतावणी दिली होती.  हा इशारा भारत सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला होता, कारण हे अधिकारी थेट पंतप्रधानांना अहवाल देतात.  रॉयटर्स ने सांगितले की, इन्साकॉगच्या शास्त्रज्ञांनी पंतप्रधान मोदींच्या अधिकाऱ्यांना किंवा पंतप्रधानांना याबाबत इशारा दिला होता की नाही याची पुष्टी करता आली नाही.  कारण पीएम मोदी यांच्या कार्यालयाकडून रॉयटर्सला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
भारत सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्ये इन्साकॉगची स्थापना केली होती.  हा वैज्ञानिक सल्लागारांचा एक मंच आहे, जो कोरोना विषाणूच्या जीनोमिक व्हेरीएंट धोक्यांविषयी सूचना देत असतो.  कोरोना विषाणूच्या प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी इन्साकॉगने देशातील १० मोठ्या प्रयोगशाळा एकत्र आणल्या.  याच्या माध्यमातून इन्साकॉग सरकारला या विषाणू च्या धोक्याविषयी आणि प्रकारांविषयी माहिती देऊ शकेल. तसेच संभाव्य धोक्याची चेतावणी देखील देता येईल.
इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेसचे संचालक आणि इन्साकॉगचे सदस्य अजय परीदा यांनी सांगितले की, फेब्रुवारीच्या सुरूवातीला भारतीय कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरीएंट, बी १.६१७ सापडला.  आरोग्य मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडे (एनसीडीसी) १० मार्च रोजी या व्हेरीएंट विषयी माहिती देण्यात आली होती.
१० मार्चच्या आसपास इन्साकॉगने एक मीडिया ड्राफ्ट तयार केला, जो रॉयटर्सनी पाहिला आहे.  या मसुद्यात सांगण्यात आले आहे की, भारतीय रूप B.1.617 ने दोन नवीन म्यूटेशन रूपे तयार केली आहेत.  ते शरीराच्या पेशींमध्ये सहजपणे चिकटून लोकांना अधिक लवकर संक्रमित करीत आहेत.
मसुद्यात असे म्हटले होते की, या म्यूटेशनची नावे E484Q आणि L452R आहेत.  हे म्यूटेशन  ‘गंभीर चिंतेची बाब’ आहे.  शास्त्रज्ञांनी चेतावणी दिली की दोन्ही म्यूटेशन व्हायरस लोकांच्या शरीरात सहजतेने प्रवेश करीत आहेत.  हे मनुष्याच्या प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम करीत आहेत.  परंतु आरोग्य मंत्रालयाने सुमारे २ आठवड्यांनंतर २४ मार्च रोजी ही माहिती सार्वजनिक केली.  मंत्रालयाच्या मीडिया निवेदनामध्ये ‘गंभीर चिंता’ हा शब्द समाविष्ट केलेला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा