बारामती, १४ फेब्रुवरी २०२१: २०२१ पासुन गेल्या दहा महिन्यांत बारामती परिमंडलातील ४ लाख ८१ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी एकही वीजबिल न भरल्याने महावितरणची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली असुन महावितरणला वीज खरेदी व वितरण करणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी आपली थकीत रक्कम भरणे अन्यथा महावितरणपुढे थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या काळात घरगुती ग्राहकांची वीज मागणीचे प्रमाण फार मोठे होते. त्यात मीटरचे रिडींग व वीजबिलाची छपाई बंद असल्याने ग्राहकांना छापील बिलाऐवजी मोबाईल मेसेजवर बिले देण्यात आले होते. ही बिले देखील सरासरीने कमी होती. प्रत्यक्षात जून महिन्यापासून रिडींग सुरु होताच. रिडींगनुसार बिले देण्यात आली. मात्र, यापूर्वीची बिले न भरल्याने ग्राहकांकडे थकबाकी वाढत गेली. यासाठी थकबाकीचे हप्ते देखील करण्यात आले. तर एकरकमी बील भरणाऱ्यांना बिलात सवलत देण्यात आली. बिलातील शंका दूर करण्यासाठी https:
billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक देऊन प्रत्येकाला त्याचा वापराचा हिशोब दिला.
वीजग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात ३२०१ वेबिनार, ५६७८ मेळावे घेण्यात आले होते. तसेच १५५२४ मदत कक्ष सुरु करण्यात आले होते. त्यापैकी १७४२ मदत कक्ष अद्यापही सुरु असून, त्यातून आलेल्या ९८०४९९ पैकी ९३३३२४ तक्रारींचे निवारण देखील केलेले आहे.
बारामती परिमंडलामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील जवळजवळ १० लाख ग्राहकांकडे ५१८ कोटी रुपये थकीत असून त्यातील दहा महिन्यांत एकदाही वीजबिल न भरणारे ४ लाख ८१ हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे ३४० कोटी येणेबाकी आहे. विंनत्या, आवाहन करुनही रक्कम वसूली झाली नसल्याने आता वीज कायद्यातील तरतुदीनुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव