नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांना पुन्हा दिली जाणार लसीची दुसरी मात्रा

नागपुर, १९ नोव्हेंबर २०२० : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २३ ऑक्टोबरपासून पन्नास स्वयंसेवकांना ऑक्सफोर्डची कोविशिल्ड ही लस देण्यात आली होती. २८ दिवस पूर्ण होणार असल्यानं या आठवड्यात या स्वयंसेवकांना पुन्हा या लसीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात कुणातीही लस दिल्यावर गुंतागुंत वाढली नसल्याने डॉक्टरांमध्ये उत्साह आहे. १८ ते ५५ वयोगटातील एकही समस्या नसलेल्या आणि निरोगी असलेल्या पहिल्या १५ स्वयंसेवकांना २३ आणि २४ ऑक्टोबरला ही लस दिली गेली. त्यानंतर इतर ३५ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. त्यापूर्वी संबंधित स्वयंसेवकांची करोनासह इतरही रक्त तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकही आजार नसलेल्या स्वयंसेवकांना ही लस दिली गेली.

लस दिल्यावर पहिले दोन तास स्वयंसेवकांना एका विशिष्ट वार्डात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवलं गेलं. त्यात काहीही अनुचित न आढळल्यावर त्यांना घरी सोडण्यात आलं. घरी सोडण्यापूर्वी स्वयंसेवकांना गर्दीत न जाण्यासह इतरही आवश्यक काळजी घेण्याबाबत समुपदेशन करण्यात आलं.

दरम्यान, लस दिल्यापासून आजपर्यंत एकाही रुग्णामध्ये कोणताही विपरित परिणाम झाल्याचं नोंदवलं गेलं नाही. आता दुसऱ्या लसीनंतर या लसीचा प्रतिपिंड निर्माण करण्यावर काय सकारात्मक परिणाम होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या कंपनीनं केला आहे. ही कंपनी तयार करत असलेली लस ९४ टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे.

एकाच आठवडयात लसीच्या चांगल्या कामगिरीचा दावा करणारी मॉडर्ना ही दुसरी अमेरिकी कंपनी आहे. यापूर्वी फाइजर या कंपनीनं त्यांची लस ९० टक्के प्रभावी ठरल्याचा दावा केला होता. सुरक्षित डेटा समोर आल्यानंतर नियामक मंडळाकडून मंजुरी मिळाली तर अमेरिकेत डिसेंबपर्यंत दोन कोरोना लसींचा आपात स्थितीत वापर केला जाऊ शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा