नाईक आत्महत्याप्रकरणात तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी होणार

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२०: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली होती. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकानं त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर या प्रकरणाविषयी पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. अन्वय नाईक यांनी शनिवारी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित राहिलं होतं. त्यामुळं आता तत्कालीन तपास अधिकारी अनिल पारसकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाचा तपास थांबवण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केलाच नसल्याचं मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळीही न्यायमूर्ती एम.एम. शिंदे यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाच्या तपासावर ताशेरे ओढले होते. नाईक कुटुंबीयांना अंधारात ठेवून क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आल्याचं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं होतं.

नाईक कुटुंबियांकडून देखील या प्रकरणाबाबत वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. सुशांतसिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचं नाव आहे, तरीही कारवाई का केली गेली नाही? असा सवाल आज्ञा नाईक यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता.

सातत्यानं पाठपुरावा करुनही योग्य चौकशी करण्यात आली नाही. उलट आमच्यावरच सूडबुद्धीनं खटला दाखल केल्याचा आरोप लावण्याचा प्रयत्न झाला. रायगडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून आम्हाला सातत्यानं तपास सुरु असल्याचं सांगितलं गेलं. पण, त्यात कुठलीही प्रगती झाली नाही, त्यामुळे आता रायगडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर आणि सुरेश वराडे हे गोत्यात येण्याची शक्यता आहे. तर अनिल पारसकर यांच्यावर कारवाईची शक्यताही व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा