पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण

नागपूर, १५ नोव्हेंबर २०२०: पाकिस्तानने शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आलं आहे. पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथले ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना हौतात्म्य आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, भूषण सताई हे श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. पाकिस्तानने शुक्रवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, यामध्ये दोन जवानांना वीरमरण आलं. ऋषिकेश जोंधळे हे पूंछ जिल्ह्यातल्या सावजीयानमध्ये तैनात होते. पाकिस्तानच्या गोळीबारात जोंधळे जखमी झाले. त्यांना पुढील उपचारांसाठी सैनिकी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असतानाच त्यांना हौतात्म्य आलं.

मीडिया रिपोर्टनुसार, भूषण सताई हे अवघे २८ वर्षांचे होते. ते २०११ मध्ये सैन्यात भर्ती झाले होते. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे काटोलमध्ये शोककळा पसरली. याबरोबरच या गोळीबारात अवघ्या २० वर्षांचे महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे देखील शहीद झाले. जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

ऋषीकेश जोंधळे हे १६ डिसेंबर २०१८ मध्ये मराठा लाईफ इन्फ्रट्रीमध्ये शिपाई म्हणून भरती झाले होते. ऋषीकेश हे राष्ट्रीय खेळाडू होते. ११ नोव्हेंबरला म्हणजेच ३ दिवसांपूर्वी ऋषीकेश यांनी घरी आई वडिलांशी संपर्क साधला होता. तोच त्यांचा अखेरचा फोनकॉल ठरला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा