सोलापूर ५ ऑगस्ट २०२४ : महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक, १२३ टीएमसी इतका पाणी साठा करणारं सोलापूर-पूणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं ‘उजनी’ धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा विसर्ग बघता धरण प्रशासनाने धरणाचे ४१ पैकी १६ दरवाजे ४९ सेंटीमीटरने उचलून ४० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदिपात्रात सोडला आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाचे सावधानतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे धरण भरल्याने सामान्य सोलापूरकर, शेतकरी, व्यापारी आणि साखर कारखानदार आनंदित झाले आहेत.
गेल्या आठ दिवसांत उजनी धरण साखळीतील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. ब-याच धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. शनिवारी हवामान खात्याने पूणे जिल्ह्याला दिलेल्या रेड अलर्ट चा अंदाज खरा ठरत परिसराला पावसाने झोडपून काढल्याने ओढे, नद्या, नाले भरून वाहू लागल्याने धरणातील सोडलेल्या विसर्गात वाढ झाल्याने मुळशी ३०२१८, खडकवासला ४५७०५ यासह धरण साखळीतील बारा धरणातून पाणी सोडल्याने बंडगार्डन ७३५२८ व दौंड ९८६७५ क्युसेक उजनी जलाशयात मिसळत आहे. तर परिसरात पावसाची संततधार कायम आहे. उजनी धरणात ९१ टक्के पाणीसाठा ( ११२.६८ टिएमसी ) झाला आहे. पुरनियंत्रणासाठी उजनी चे १६ दरवाजे ४० सेंटीमीटर ने उचलून विसर्ग सोडण्यात आला आहे. यात टप्या टप्प्याने वाढ करून जवळपास ६० हजार क्युसेक चा विसर्ग सोडण्यात येणार आहे. निरा खो-यातही पावसाची संततधार चालूच असल्याने भाटघर २४५००,वीर ६१९२३,गुंजवणी ४०३२,निरा देवधर ७९५२ या धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे पंढरपूर शहरावर पुरस्थितीची टांगती तलवार आहे.
२००६ साली उजनी तून २ लाख ७५ हजार क्युसेक आणि वीर मधून १ लाख ८ हजार क्युसेक विसर्ग सोडल्याने पंढरपूर शहरात महापूर येऊन नागरिकांची दैना उडाली होती.यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले होते.
धरणातील पाणीसाठा-
टक्केवारी ..९१.५० टक्के
एकूण साठा ..११२.६८ टीएमसी
उपयुक्त साठा..४९.२१ टीएमसी
उजनीत येणारा विसर्ग
दौंड.. ९८६७५ क्युसेक
बंडगार्डन – ७३७५८
सोडण्यात आलेला विसर्ग-
विजनिर्मिती १६०० क्युसेक
बोगदा ३०० क्युसेक्स
भीमा नदी २०,००० क्युसेक्स
धरण साखळीतील सोडलेला पाण्याचा विसर्ग क्युसेक मध्ये-
येडगाव ७५००, वडज ५०००डिंबे१८०००, घोड १००००, चिलेवाडी ३८१८, कळमोडी २९७४, चासकमान २९७९०, भामा असाखेड ६२००,वडीवळे८६९८,आद्रा ४०५६,पवना३४५०,मुळशी ३०२१८, पानशेत ११८३२, खडकवासला ४५७०५,वरसगाव ११८५८,टेमघर १२७३
निरा खोरे -भाटघर २४५००,वीर ६१९२३,गुंजवणी ४०३२,निराधार देवधर ७९५२
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने यावर अलंबून असलेल्या शेतीचा तसेच औद्योगिक वसाहतीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा सोलापूर, उस्मानाबाद शहरासह अनेक गावचा प्रश्न मिटला आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरले तर या भागातील उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यामुळे साखर कारखाने पुर्ण क्षमतेने, पूर्ण वेळ चालतात यामुळे परिसरातील उद्योग व्यवसायात वाढ होत असल्यामुळे सामान्य माणूस, शेतकरी, व्यापारी, उद्योजक आनंदीत झाला आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : संतोष वाघमारे