नाशिक, २७ नोव्हेंबर २०२३ : नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या, द्राक्ष आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत येत्या २ दिवसात पंचनामा पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. निफाड तालुक्यातील सुकेणे शहरात पालकमंत्री दादा भुसे यांनी शेताला भेट देऊन अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तहसील कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, कृषी सहायक योगेश पाटील, कृषी अधिकारी डॉ. अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे उद्दिष्ट येत्या दोन दिवसांत पूर्ण करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी नुकसानीबाबत पीक विमा कंपनीकडे नोंदणी करावी. आपत्ती निवारणापासून कोणीही वंचित राहू नये, नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड