पिंपरी, ३० जून २०२३: जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिल्याने पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झालीय. गुरुवारी पाणीसाठा वाढून १८.१४ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर असलेली संभाव्य पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.
जून महिना संपत आला तरी, मावळ तालुक्यातील पवना धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नव्हती. पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत होता. तो साठा जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पाणीकपात लागू करण्याबाबत नियोजन सुरू होते. धरणात मंगळवारपर्यंत १७.५५ टक्के इतकाच पाणीसाठा होता.
आता तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झालीय. डोंगरातील ओढे पाण्याने वाहू लागले आहेत. तर काही ठिकाणी धबधबे सुरू झाले. हे पाणी धरण क्षेत्रात जमा होऊ लागल्याने दोन दिवसाखाली बुधवारी धरणातील पाणीसाठा १७.६७ टक्के इतका झाला. तर गुरुवारी पाणीसाठा १८.१४ टक्के इतका वाढला आहे. यामुळे आता पाणीकपातीचे संकट दूर होईल अशी आशा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना वाटतेय.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर