पुणे : पुण्यातील खराडी येथे गॅस गळती होऊन स्फोट झाला.या स्फोटात सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.तर आई-वडील जखमी झाले आहेत.
पुण्यातील खराडी परिसरातील संभाजीनगर येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शंकर भवाळे(वय २८ )आशाताई शंकर भवाळे(वय २६)आणि स्वराली भवाळे(६ महिने)अशी जखमींची नावे आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, भवाळे कुटुंब खराडी येथील संभाजीनगरमध्ये राहतात. रविवारी रात्री हे कुटुंबीय झोपेत असताना घरातील गॅस गळती होऊन संपूर्ण घरात गॅस पसरला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आशाताई उठल्या आणि त्यांनी पाणी तापविण्यासाठी गॅस पेटवला असता मोठा स्फोट होऊन आग लागली.
हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे चार घरावरील पत्रे उडून गेली. तर, स्वयंपाकघरातील ओट्याचेही यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटाच्या आवाजाने शेजारपाजरच्या नागरिकांनी भवाळे कुटुंबीयांच्या घराकडे धाव घेतली.
या स्फोटानंतर लागलेल्या आगीत भवाळे पती-पत्नी आणि सहा महिन्यांची स्वराली भाजले आहेत. यातील सहा महिन्याच्या स्वरालीची प्रकृती गंभीर आहे. आगीमुळे घरातील सर्व साहित्य आणि कपडे जळाले आहेत. भिंतीवरील सिमेंटही खाली पडले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तर, जखमी पती-पत्नी आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.