संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा वाढदिवस सोहळा पार पडला. निवृत्ती महाराज यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती.
शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे, भाजपचे आ. राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. आशुतोष काळे, आ. रोहित पवार, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे नेते महाराजांसोबत रथात बसले होते.
यावेळी निवृत्ती महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे रोहित पवार यांनी हजेरी लावली. या सर्व राजकीय नेत्यांना एकाच रथात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यावेळी पवार म्हणाले, इंदुरीकर महाराज हे समाजातील अंधश्रद्धा दूर करून शिक्षणाचे प्रमाण वाढावं आणि समाजात प्रेम, आपुलकी, एकोपा निर्माण होण्यासाठी आपल्या स्वतंत्र शैलीने ते काम करीत आहेत. केवळ उपदेशाचे डोस न पाजता आधी स्वत: सामाजिक कामाचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे”. त्यांच्या संस्थेत अनेक अनाथ, गरीब मुले आज मोफत शिक्षण घेत आहेत.
यावेळी इंदुरीकर म्हणाले,की मी जेवढे विखे घराण्यावर प्रेम करतो. तेवढेच प्रेम थोरात घराण्यावर करतो. पवार साहेबांना मी देव मानणारा माणूस असल्याचे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे”. जसे बाळासाहेब विखे यांच्यानंतर सर्व गुण सुजय विखे यांच्याकडे आले. तसेच शरद पवार यांचे सर्व गुण रोहित पवार यांच्याकडे आले. राजकारण, धार्मिकता या रक्तात असाव्या लागतात. राजकारण्यांनी जसा एकत्र सिनेमागृहात बसून तानाजी सिनेमा पहिला. तसेच तुमच्या कार्यकर्त्यांना गावात एका रांगेत बसायला सांगा.