नवीन उत्पादन केंद्र बनण्यास भारताला संधी

नवी दिल्ली,दि. २५ एप्रिल २०२०: कोरोना विषाणूमुळे जगात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. यामुळे पूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. जगातील बऱ्याच कंपन्या चीन च्या बाजारपेठेतील आपले आकर्षण गमावत आहेत. चीन नंतर सर्वात जास्त लोकसंख्या भारतामध्ये आहे तसेच येथील कन्झुमिंग पावर देखील तेवढीच मोठी आहे. त्यामुळे आता जागतिक कंपन्यांचे लक्ष भारताकडे लागले आहे. आता जवळपास १००० कंपन्या आपल्या उत्पादन प्रक्रिया भारतामध्ये स्थापन करण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अन्य अधिकृत संस्थांशी चर्चा करीत आहेत.

यापैकी ३०० कंपन्या मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे आणि वस्त्रोद्योगाच्या उत्पादनाशी संबंधित आहेत. भारत सरकारने देखील परकीय कंपन्यांसाठी आता कर कमी केला आहे त्यामुळे भारतामध्ये गुंतवणूक करण्यास या कंपन्या प्राधान्य देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया आज चीनवर जास्त अवलंबून आहेत.

चीनच्या सांख्यिकी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चीनची अर्थव्यवस्था मागील वर्षाच्या तुलनेत २०२० वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ८.१ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या तीन दशकांत प्रथमच ही घसरण दिसून आली. एकीकडे चीनच्या कोरोना महामारीमुळे आपली उत्पादन केंद्रे बंद करावी लागली आणि दुसरीकडे चीनमधील लॉकडाऊन उघडल्यानंतर जगभरात या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे इतर देशांत चिनी वस्तूंच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे मागणीमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नाही.

चिनी वस्तूंच्या परदेशी ग्राहकांनी त्यांच्या ऑर्डर्स एकतर पुढे ढकलेले किंवा रद्द केले आहेत. कोरोना मुळे ओढवलेल्या आर्थिक मंदीमुळे नवीन आणि मागील ऑर्डरची देणी सुद्धा परकीय ग्राहकांकडून चीनला मिळालेली नाही. त्यामुळे मागच्या तिमाहीमध्ये चीनची अर्थव्यवस्था ढासळली होती परंतु आता चीनमध्ये या विषाणूचा प्रभाव कमी झाला आहे, परंतु इतरत्र पूर्ण जगामध्ये याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे त्यामुळे चीन जरी उत्पादन करू शकला असला तरी त्याचे ग्राहक असलेले इतर देश मात्र हे उत्पादन खरेदी करू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीमध्ये सुद्धा चीनची अर्थव्यवस्था आणखीन खालावण्याची शक्यता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा