नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २७ एप्रिल २०२० : कोरोना या महामारीने सध्या जगात हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे आतापर्यंत जगात दोन लाख लोकांचा बळी गेला आहे. याशिवाय २९ लाख जणांना संक्रमित केलं आहे. या महामारीचा जागतिक स्तरावर सर्वात मोठा फटका अमेरिका या देशाला बसला आहे. मात्र सध्या भारतामध्येही दिवसागणिक करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत २५ हजारांहून अधिक जणांना कोरोनाने ग्रासलं आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशभरात अधिकच वाढत आहे.
एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला काही महाभाग या समस्येला फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र समोर आले आहे. आंध्रप्रदेशमधील विजयवाडा शहरात लॉकडाऊनमुळे टाइमपास म्हणून मित्र आणि शेजाऱ्यांच्याबरोबर पत्ते खेळत होते. मात्र एकमेकांच्या जास्त संपर्कात आल्याने पत्ते खेळण्याच्या नादात २४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए मोहम्मद इम्तियाज यांनी ही माहिती दिली. याबाबत हिंदुस्थान टाइम्सने वृत्त दिले आहे.
यावेळी इम्तियाज म्हणाले की, विजयवाडाच्या एका भागात एका ट्रक चालकाबरोबर आणखी १५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या दोन घटनांमुळे सुमारे ५० जण कोरोना विषाणू बाधित झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी