खासदार सुप्रिया सुळेंनी घडवून आणली मायलेकरांची भेट. आजोळी अडकून पडले होते ४५ दिवस

बारामती : २७ एप्रिल २०२० : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आजीकडे गेलेल्या दोन मुलांची खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे आई-वडिलांशी भेट झाली. तब्बल ४५ दिवस आईच्या आठवणींनी मुले आणि मुलांच्या आठवणींनी आई व्याकुळ झाले होते. आता मात्र या कुटुंबात आनंद संचारला असून सर्वांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे भरभरून आभार मानले.
पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या सुरेखा आणि श्रीकांत तेली या दांपत्याची कियान आणि किमया अशी ही दोन मुले आहेत. ही दोघं औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अंधानेर या गावी आपल्या आजीकडे गेली होती. दोन्ही मुले तिकडे गेल्यानंतर कोरोनामुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली. अवघा सहा वर्षांचा कियान आणि नऊ वर्षांची ही मुले आज-उद्या जाता येईल म्हणत वाट बघत होती. मात्र दिवसामागून दिवस सरू लागले तरी वाहतूक सुरू होईना. आधी २१ दिवस असलेली टाळेबंदी पुन्हा वाढली. त्यानंतर तर दोन्ही मुले आई-वडिलांच्या आठवणींनी रडू लागली. इकडे आईचा जीवसुद्धा कासावीस झाला. मोबाईल वरून एकमेकांशी संपर्क होत असला तरी प्रत्यक्ष भेट घेऊन आईच्या कुशीत झेपावण्यासाठी मुलं अक्षरशः व्याकुळ झाली होती. काही मार्गच दिसत नव्हता. त्यामुळे अखेर सुरेखा तेली यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यास अपेक्षित यश आले आणि गेले ४५ दिवस आईच्या भेटीसाठी आतुर झालेल्या त्या दोन्ही मुलांना पुण्यात आणण्याची परवानगी मिळाली.
आवश्यक परवानग्या घेऊन कन्नड तालुक्यातून रवाना झालेली गाडी कालच दोन्ही मुले घेऊन खराडी येथील तेली यांच्या घरी पोहोचली. दारात गाडी पोहोचताच मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. डोळ्यात अश्रू आणून सुरेखा तेली यांनी मुलांना कवटाळले आणि खासदार सुळे यांचे भरभरून आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा