अ.नगर, दि.७ मे २०२० : नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी तालुक्याच्या हद्दीत बुधवारी ( दि.६) रोजी दुपारी बिअर घेऊन जाणारा टेम्पो उलटला. त्यामुळे तळीरामांची चांगलीच मज्जा झाल्याचे पहायला मिळाले. तळीरामांनी बिअरच्या बाटल्यांवर चांगलाच हात साफ करून घेतला. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तळीरामांना हाकलवून लावत वाहतूक सुरळीत केली.
या घटनेत चालक राजेंद्र सिताराम गाडेकर आणि गणेश अशोक धनवटे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आयशर टेम्पो वाहन क्रमांक एम एच १७ बी वाय ३५१८ नगर येथून बिअर बॉक्स शिर्डीकडे घेऊन जात असताना गुहा शिवाराजवळ अचानक मागील बाजूचे टायर फुटून टेम्पो जागेवर पलटी झाला. यामध्ये वाहनाचे तसेच बिअरच्या बाटल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ऐन लॉकडाऊनच्या काळात बिअरचा ट्रक पलटी झाल्याने परिसरातील तळीरामांनी कुठलीही भीती न बाळगता बिअरचे बॉक्स घेऊन पोबारा केला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत तळीरामांना हाकलवून लावत वाहतूक सुरळीत केली.
न्युज अनकट प्रतिनिधी: