मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भिगवणला भेट

इंदापूर, दि.११ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण याठिकाणी भेट देवून परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनाला सक्त सूचना केल्या. जि.प. च्या समाज कल्याण विभागाची शरद भोजन योजना व कोरोनाशी लढाई कशी लढावी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
भिगवण येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने सध्या कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन पाळला जात आहे. यामुळे या झोनची पाहणी करण्यासाठी प्रसाद यांनी भिगवणला भेट दिली. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रवीण कोरघंटीवार , तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, डॉ. राजेश मोरे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे, सचिन बोगावत यांसह तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथील कंटेनमेंट झोनची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आले होते.
यावेळी त्यांनी तालुका स्तरावरील सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली. कोरोनापासून ज्येष्ठ नागरिकांना कसे रोखले पाहिजे, त्याचप्रमाणे हृदयविकार, शुगर आदी प्रकारचे रोग असणाऱ्या लोकांनादेखील कोरोनापासून दूर कसे राखायचे याबाबत प्रसाद यांनी मार्गदर्शन केले.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी होम क्वारंटाईन आणि सामाजिक विलगीकरण होऊन बसले पाहिजे. त्यामुळे सामाजिक अंतर पाळले जाईल व त्यामुळे करोनाचा धोका होणार नाही. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शरद भोजन योजना राबवण्यात येत आहे. त्या माध्यमातून नागरिकांना अन्नधान्य त्याचप्रमाणे दोन वेळचे जेवण देण्याची सुविधा करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे दीड हजार लोक दररोज जिल्हा परिषदेच्या या भोजन योजनेचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील शरद भोजन योजनेअंतर्गत बाहेरून आलेल्या लोकांसाठी व ज्यांना रेशनकार्ड नाही अशा लोकांसाठी देखील गहू,तांदूळाचे वाटप करण्यात येत आहे. आत्तापर्यंत जवळपास एक लाख दहा हजार लोकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा