१७ हजार कैदी सोडण्याचा निर्णय: अनिल देशमुख

मुंबई, दि. १३ मे २०२०: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात ४५ ठिकाणी असलेल्या ६० कारागृहांतील ३५ हजार कैद्यांपैकी १७ हजार कैदी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑर्थर रोड कारागृहातील १५८ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यामुळे इतर कैद्यांना बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

१७ हजार ६४२ कैदी कारागृहातून मुक्त होणार :

सात वर्षांपेक्षा कमी सजा असलेल्या गुन्ह्यातील ५,१०५ न्यायाधीन कैद्यांची यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. तसेच ३,०१७ शिक्षाधीन कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आता सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील न्यायाधीन ९,५२० कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडणार आहे. अशा प्रकारे एकूण १७ हजार ६४२ कैदी कारागृहातून मुक्त होणार अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

या गुन्हेगारांना सोडण्यात येणार नाही :

मोक्का, टाडा, पोटा, पोक्सो, युएपीए, पीएमएलए, एनडीपीएस, एमपीआयडी यासह एक्स्प्लोसिव्ह सबस्टन्स अॅक्ट, अँटी हायजॅकिंग अॅक्ट, फॉरेनर्स इन प्रिजन, बँक फ्रौड, मेजर फायनान्शियल स्कॅम आदी अंतर्गत गुन्ह्यातील कैद्यांना सोडण्यात येणार नाही.

ही कारागृहे आहेत लॉकडाऊन :

राज्यातील मुंबई, ठाणे, येरवडा, नागपूर, नाशिक, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहांसह भायखळा, कल्याण जिल्हा कारागृहे ही आठ कारागृहे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. आत असणारे पोलीस कर्मचारी देखील आतच असतील अशी व्यवस्था त्या-त्या कारागृहांमध्ये करण्यात आली आहे.

कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास कैद्यांना ठेवण्यासाठी तात्पुरते कारागृह घोषित करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आल्याचीही माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा