बार्डी (पंढरपूर), दि. १४ जून २०२०: बार्डी येथिल कोरोना झालेल्या रुग्णास उपचारानंतर घरी सोडणे आवश्यक असतानाही कुंभारी येथील आश्विनी रुग्णालयाने ३२ हजार आठशे रुपये बील भरण्याची मागणी करत डिस्चार्ज देणे नाकारले आहे . रिपोर्ट निगेटिव्ह येऊन देखील मागील दोन दिवसापासून बीलाची मागणी करत रुग्णास डांबून ठेवल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत मनसेचे राज्य सरचिटणिस दिलीप धोत्रे यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले, आमदार भारत भालके, सोलापूर येथील आरोग्य अधिकारी श्री.पांडे, पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, आदींना सदर घटनेची माहिती देवून तीव्र नाराजी व्यक्त करत सदर रुग्णास ताबडतोब मुक्त करण्याची विनंती केली आहे.
बार्डी(ता.पंढरपूर) येथील सज्जन खंदारे यांना संस्थात्मक विलिगीकरणात असताना एक जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी करकंब ग्रामीण रुग्णालयामार्फत सोलापूर येथे पाठविण्यात आले. तेथून त्यांना कुंभारी येथील आश्विनी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतर ते बरे होवून त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांनतर त्यांच्या कुटुंबियांना ते घरी परतण्याची ओढ निर्माण झाली. पण रुग्णालयाने कोरोनाच्या उपचाराचे ३२ हजार आठशे रुपये भरा, तरच रुग्णास घरी सोडू, असे सांगितल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
मजुरी करुन उपजिविका करणाऱ्या या कुटुंबाला एवढी रक्कम भरणे शक्य तर नव्हतेच पण कोरोनाग्रस्त रुग्णांवर शासन मोफत उपचार करत असताना पैशाची मागणी केल्याबद्दल त्यांनी मनसेचे राज्य सरचिटणिस दिलीप धोत्रे यांच्याकडे धाव घेतली. श्री.धोत्रे यांनी तातडीने संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदर रुग्णाची तातडीने सुटका करण्याची विनंती केली आहे.
शासनाकडून जमा होणारी रक्कम प्राप्त न झाल्यामुळे गोंधळ : डॉ.तुषार सरवदे
बार्डी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाकडे कुंभारी येथील आश्विनी रुग्णालयाने पैशाची मागणी केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. त्यांना रक्कम भरु नका म्हणून सांगितले आहे. शिवाय सोलापूर आणि पंढरपूर येथील प्रशासनालाही याबाबत कल्पना दिली आहे. शासनाकडून जमा होणारी रक्कम संबंधित रुग्णालयास प्राप्त न झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असून एक-दोन दिवसात सदर रुग्णास घरी सोडतील असे डॉ.तुषार सरवदे (वैद्यकिय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, करकंब) यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील