मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागात साठले पाणी

मुंबई, दि. ३ जुलै २०२०: काल हवामान खात्याने दिलेल्या चेतावणी नुसार आज मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काल हवामान खात्याने मुंबई ठाणे व इतर भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची चेतावणी दिली होती. विशेष म्हणजे मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. आज संपूर्ण मुंबईत सकाळपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली. दरम्यान, मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्रात उंच लाटा उसळताना दिसत आहेत. या लाटांची उंची ४.४१ मीटर इतकी आहे.

मुंबईसह मुंबईच्या इतर उपनगरी भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. उपनगरातील कांदिवली, मलाड, बोरीवली भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत सुरू झालेल्या मुसळधार पावसासह आता मुंबईत ठिकठिकाणी पाणी साठण्यास देखील सुरुवात झाली आहे.

घराबाहेर पडू नका पोलिसांचा आदेश

विशेष म्हणजे काल हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे मुसळधार पावसाची संभाव्य शक्यता ३ व ४ तारखेला वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज मुंबई मध्ये मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात देखील झाली आहे. ऑरेंज अलर्ट लक्षात घेता मुंबई पोलिसांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. गरजे शिवाय घराबाहेर पडू नका असे देखील पोलिसांकडून नागरिकांना सांगण्यात आले. मुंबईसह ठाणे व पालघर या ठिकाणी देखील लोकांना चेतावणी देण्यात आली आहे.

कोकणात देखील मुसळधार पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या २४ तास मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा