या पुणेरी तरुणीने कोरोनाची केली टाय – टाय फीस्स…व्हिडिओ व्हायरल

 पुणे, १९ जुलै २०२०: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पुण्यातही मोठ्या संख्येने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र अनेकजण कोरोनावर मात करून बरे होऊन घरी देखील परतत आहेत. पुण्यातील सातपुते कुटुंबाबतील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता सर्वजण यातून पूर्ण बरे  झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या आपल्या बहिणीचे स्वागत करण्यासाठी या तरुणीने केलेल्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहराने वाढत्या रुग्णसंख्येच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकलं आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुणे शहरात परत लॉकडाउन घोषित करण्यात आलं. आतापर्यंत अनेकांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनावर मात करुन बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे. आजुबाजूचं वातावरण निराशाजनक असेल तर साहजिकच रुग्णावरही त्याचा परिणाम होतो असं म्हणतात. मात्र पुण्यातील स्वामी समर्थ नगर भागात राहणाऱ्या सलोनी सातपूते या तरुणीने  या खडतर काळात सकारात्मक कसं रहायचं याचं एक उदाहरण घालून दिलं आहे.

आंबेगाव पठार मधील सातपुते  कुटुंबातील ५ जणांपैकी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. एकट्या सलोनीचा अहवाल निगेटीव्ह आला. कालांतराने चारही जण कोरोनावर मात करुन घरी परतले. नुकतीच सलोनीची बहिण स्नेहल कोरोनावर मात करुन घरी परतली. यावेळी सलोनीने, हट जा रे छोकरे….गाण्यावर डान्स करुन आपल्या बहिणीचं स्वागत केलं. सलोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आजुबाजूला गंभीर वातावरण असतानाही सकारात्मक आणि हसतमुखाने संकटाचा सामना करणाऱ्या सलोनीचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

या व्हिडीओत उपचार घेऊन घरी परतणारी सलोनीची बहिणही तिच्यासोबत नाचताना दिसत आहे. घरी परतल्यानंतर सलोनीच्या आईने औक्षण करत तिचं स्वागत केलं. सलोनी आनंदाच्या भरात मास्क घालायचं विसरली, याबद्दल तिने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा