बारामती, ८ ऑगस्ट २०२० : बारामती शहरातील शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ” छत्रपती संभाजी महाराज ” यांच्या नावाने असणाऱ्या “संभाजी बिडी” हे बदनामी करणारे बिडी उत्पादन बंद करावे असे निवेदन बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांच्यासह दिले आहे.
तसेच राज्यातील पंधरा जिल्ह्यातून याबाबतचे निवेदन दिले आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी यांच्या नावाने महाराष्ट्रात गेल्या ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने बिडी उत्पादन सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचं युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती असून देखील जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं आहे. या बिडीच्या बंडल वर महाराजांचे नाव आणि फोटो देखील वापरले जात आहे.
धुम्रपान करणारे लोक बिडीचा कागद फाडून देतात. हा कागद अनेक वेळा पायाखाली तुडवला जातो, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होत आहे. हा अवमान सहन केला जाणार नाही. म्हणून या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलून निर्मिती करावे. अशी मागणी तहसीलदारांकडे शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या निवेदनावर कारवाई न झाल्यास १ सप्टेंबर पासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव