सैनिकांच्या सत्तेसाठी पंतप्रधान-संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी: सामना

मुंबई, १४ सप्टेंबर २०२०: काही दिवसांपूर्वी माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. या अधिकाऱ्यानं देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर शिवसेनेचे नेते व सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे . सामनातील आपल्या अग्रलेखातून त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. घटनात्मक पदावर असलेल्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांचं आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर फिरवणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याला स्वतः संरक्षणमंत्री फोन करुन धीर देत असतील तर राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, विद्यमान लष्करप्रमुख, नौदलप्रमुखांची बदनामी केली तर चिंता करु नका, असा खोचक सल्ला अग्रलेखात केंद्र सरकारला देण्यात आलाय.

मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांनं मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, यावर देखील संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. मारहाणीसाठी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या माजी अधिकाऱ्यानं चीन सीमेवर २० जवानांच्या हत्येस जबाबदार धरुन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, असं त्यांनी आपल्या अग्रलेखात म्हटलं.

सामना अग्रलेखात म्हटलं आहे, “चीनच्या सीमेवर २० जवान शहीद झाले. त्यांच्या हत्येचा बदला अद्याप घेतलेला नाही. चीनची अरेरावी कायम आहे. हे जे माजी नौदल अधिकारी आहेत त्यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात भाजपने रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. आता या माजी नौदल अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यापुढे हे महाशय जी काही मागणी करतील ती करु द्यात, पण आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी २० जवानांची हत्येस जबाबदार राष्ट्रपती, पंतप्रधान संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, पण सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरु आहे तो पाहता ऑलम्पिकमध्ये पोरखेळ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल.”

“लोकांच्या पोटापाण्याचा, रोजीरोटीचा, शिक्षणाचा, आरोग्याचा विषय राष्ट्रीय पातळीवरच चर्चेला आला पाहिजे, पण लोकांच्या पोटापाण्याचे, सुरक्षेचे विषय अडगळीत ढकलण्यासाठी इतर नको ते विषय उकरुन काढले जात आहेत. हा जनताद्रोहच आहे. चीनच्या प्रश्नावरुन लक्ष हटवण्यासाठी खटाटोप सुरु आहे. महागाई, बेरोजगारी या जणू समस्या नाहीत, असे वातावरण सरकारी पक्षाच्या सायबर फौजा करत आहेत. आता त्यांनी या महान राष्ट्रीय कार्यास पुढे नेण्यासाठी मुंबईची जाणीवपूर्वक निवड केली आहे. जे कुणी निवृत्त अधिकारी महोदय आहेत त्यांनी राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर फिरवून काय मिळवले? घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कुणी शिकवले नव्हते का?” असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा