बारामती, दि. १३ सप्टेंबर २०२०: बारामती शहर तालुक्यात ७ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या जनता कर्फ्यूची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे २० सप्टेंबरच्या मध्यरात्री पर्यंत सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार ‘माझा मतदार संघ, माझे कुटुंब’ या प्रमाणे कोवीड चाचणी केली जाणार आहे.
१ सप्टेंबर पासून शहर, तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रविवार (दि. १३) पर्यंत कोरोना रुग्ण संख्येने दोन हजारांचा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या २०५५ वर पोहचली आहे. रुग्ण संख्येचा आलेख चढता राहिल्याने आज जनता कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७ सप्टेंबर पासूनच प्रशासनाने कडक निर्बंध लागु करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला होता. मात्र व्यापाऱ्यांनी हा निर्णय एकतर्फी असल्याचे सांगत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर जनता कर्फ्यू सात दिवसांचा करण्यात आला होता. परिस्थिती न सुधारल्यास मुदत वाढविण्यात येईल, असा इशारा देखील प्रशासनाने दिला होता.
या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येत वाढ सुरूच राहिली. परिणामी जनता कर्फ्यू मुदत वाढवली आहे. यामध्ये वृत्तपत्र, मेडीकल, दुध वगळता सर्व सेवा, व्यवसाय बंद राहणार आहेत. बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने ‘सील’ करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी किरणराज यादव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, जवाहरशेठ शहा, नरेंद्र मोता, स्वप्नील मोता आदींच्या उपस्थितीत प्रशासन भवन येथे व्यापारी संघटनांची बैठक रविवारी पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
बारामती तालुका व शहर दि १४ सप्टेंबर ते २० पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे. पुढील सात दिवस कोणालाही अत्यावश्यक सेवा वगळता घरातून बाहेर पडता येणार नाही. तसेच शहरातून बाहेर किंवा बाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही. तालुक्यातील कोरोना संसर्गाने बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.शहरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जनता कर्फ्यू महत्त्वाचा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तालुक्याबाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही प्रत्येक गावातील लोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता आपल्या गावाची वेस बंद करायची आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय, हातगाडी, अन्य विक्रेते सुरू राहणार नाहीत.
शहरात प्रत्येक प्रभागात नागरिकांची ऑक्सिजन, तापमानाची तपासणी केली जाईल. तसेच संशयित रुग्णांची जागेवरच कोरोना तपासणी केली जाणार आहे. ग्रामीण भागात देखील तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वच ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. यामध्ये १५ पेक्षा अधिक रुग्ण सापडणाऱ्या भागात तातडीने तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी