नेपाळमध्ये पुन्हा जोर धरू लागली हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी

काठमांडू, २१ सप्टेंबर २०२०: सीमेवर भारताबरोबर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळला हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी जोर धरत आहे. १९ सप्टेंबर रोजी नेपाळमध्ये साजरा झालेल्या संविधान दिनाच्या निमित्तानं पुन्हा हिंदु राष्ट्राच्या निर्मितीची मागणी केली गेली. नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केलाय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी देशहितासाठी सनातन हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची मागणी केली.

कमल थापा यांनी ट्वीट केलं की, ‘राष्ट्राच्या मोठ्या हिताचा विचार करता नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं पाहिजे. पक्षाचे कार्यकर्तेही स्वाक्षरी मोहीम राबवून ही मागणी करत आहेत. नेपाळच्या जागतिक हिंदू परिषदेचे सचिव जितेंद्र कुमार म्हणतात की नेपाळमधील सुमारे ८२ टक्के लोकसंख्या हिंदू आहे. हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळच्या प्रतिमेशी छेडछाड करून त्याला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला जातोय. नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्राचा दर्जा मिळावा अशी काळाची मागणी आहे.’

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा

नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्याच्या आपल्या विचारांचे समर्थन करत ते म्हणाले की, या विषयावर नेपाळी जनतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत करावी.

२००८ मध्ये घोषित झालतं धर्मनिरपेक्ष राष्ट्र

२००६ मध्ये माओवाद्यांच्या जनआंदोलनाच्या यशानंतर नेपाळमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली. २००८ मध्ये हा देश हिंदू राष्ट्राऐवजी धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला. सध्या हिंदू लोकसंख्या ८१.३ टक्के आहे. ९.९ टक्के बौद्ध, ४.४ टक्के मुस्लिम, ३.३ टक्के किराती (देशी वांशिक) १.४ टक्के ख्रिश्चन आणि ०.२ टक्के शीख आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा