रेशन भ्रष्टाचार प्रकरणी पुरंदर तहसील कार्यालयासमोर पिंपरी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

पुरंदर, १२ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील पिंपरी येथील रेशन दुकानदारस पुरवठा विभाग पाठीशी घालत असल्या प्रकरणी त्या गावाच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पिंपरीच्या सरपंच मीना शेंडकरही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

पुरंदर तालुक्यातील पिंपरी गावातील रेशन दुकानदाराने रेशन वाटपात घोटाळा केल्याचे प्रकरण पुढे आले होते. याबाबत सरपंच मीना शेंडकर व स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर त्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. कोरोना संसर्गाचा काळ असल्याने व तातडीने पुन्हा दुसरा दुकानदार नेमने शक्य नसल्याने त्याच बरोबर शेजारील गावाच्या दुकानदारांनी पिंपरी गावातील रेशन वाटप करण्यास नकार दिल्याने प्रशासनाने पुन्हा त्याच दुकानदरास रेशन दुकान चालवण्यासाठी दिले.

दरम्यानच्या काळात दुकानदाराने न्यायालयात धाव घेऊन कोरोना असल्याने लोकांचे हाल होऊ नयेत म्हणुन दुकान पुन्हा आपल्याला चालवण्यासाठी देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्याची मागणी मान्य केली. परंतु जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सदर प्रकरणी दुकानदार पुन्हा दुकान चालवण्यासाठी देत असताना ४० दिवसाची नोटीस देऊन चाळीस दिवसात पुन्हा चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पिंपरी ग्रामस्थांनी दोन महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याची तयारी केली होती. यावेळी लवकरच तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पुन्हा चौकशी झाली परंतु जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अजूनही याबाबतचा निकाल दिला नसल्याने ग्रामस्थांनी आज पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी पिंपरी गावाच्या सरपंच मीना शेंडकर यांच्या समवेत ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.

सरपंच मिनाताई शेंडकर यांचे बरोबर ग्रामपंचायत सदस्य सुषमा थेऊरकर, कृषिभुषण महादेव शेंडकर, हरिश्चंद्रदादा थेऊरकर, शिवाजीआण्णा शेंडकर, दिलीप आप्पा हंबीर, पांडुरंग गायकवाड, रोहिदास हंबीर, दत्तात्रय हंबीर, बाळासाहेब हंबीर, गोंविद थेऊरकर, शितल चव्हाण, सुरेखा शेंडकर, कांताबाई शेंडकर, उषा चव्हाण, मंगल राऊत, शारदा थेऊरकर, मंदा थेऊरकर ईत्यादी उपोषणास बसले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा