मुंबई, २४ ऑक्टोबर २०२०: कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता या वर्षी सर्वच सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. म्हणजेच या वर्षीचे सर्व सण जवळजवळ घरातूनच साजरे करण्यात आले. सर्व प्रकारचे देवस्थाने, मंदिरे, मशिदी या काळात बंद होते. मात्र, आता लॉक डाऊन हटवण्यात आलंय. बऱ्याच गोष्टी देखील सुरू करण्यात आल्या आहेत. तरीही राज्य सरकार याबाबत अजूनही सावधगिरी बाळगत आहे. येत्या ३० तारखेला ईद-ए-मिलाद येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या उत्सवास देखील सार्वजनिक परवानगी न देता हा उत्सव घरातूनच साजरा करावा असे आव्हान केले आहे. त्यासाठी राज्य सरकारने नियमावली देखील जाहीर केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी येत्या ३० ऑक्टोबरला ईद ए मिलाद साजरी होणार आहे. राज्य शासनातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने ईद ए मिलादच्या मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. पण प्रतिकात्मक स्वरुपात खिलाफत हाऊस, मुंबई येथील मिरवणुकीला एका ट्रकसह १० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
तसेच खिलाफत हाऊस या ठिकाणी शासनांच्या नियमांचे पालन करुन ५ जणांना धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या प्रवचनाचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावा. त्याचे केबल टीव्ही, फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात यावे.
कंटेन्मेंट झोनमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले असून त्यात कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही. मिरवणुकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधण्यासाठी नियमांचे पालन करावे. त्या ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नसावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे